बेळगाव लाईव्ह: बसवण्णांच्या तत्त्वांना जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या प्रयत्नांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र, या तत्त्वांचा विपर्यास किंवा विकृतीकरण करण्याचा प्रयत्न झाल्यास तो सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जागतिक लिंगायत महासभेचे महासचिव तथा निवृत्त आयएएस अधिकारी डॉ. एस.एम. जामदार यांनी दिला.
बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. जामदार यांनी बसव भारत अभियान तसेच आगामी लिंगायत जनगणना आणि जनजागृती अभियानाची माहिती दिली.
भाजप नेते अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या बसव भारत अभियानाला आमचा विरोध नाही. मात्र, या अभियानाच्या नावाखाली बसव तत्त्वांचा विपर्यास करणे, त्यात हिंदुत्वाचे घटक समाविष्ट करणे किंवा मठांचे चुकीचे चित्रण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला ठाम विरोध केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बसवण्णांच्या वचनांच्या आधारे लिंगायत धर्मामध्ये १६ वेगवेगळे संस्कार असून, हे संस्कार वैदिक संस्कारांपेक्षा पूर्णपणे भिन्न असल्याचे डॉ. जामदार यांनी सांगितले.
पाच राज्यांत लिंगायत जनगणना अभियान
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळ या पाच राज्यांमध्ये लिंगायत जनगणना आणि जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत सुमारे २८ दिवस हे अभियान चालणार आहे.
या अभियानांतर्गत कार्यकर्ते घराघरांत जाऊन लिंगायत समाजातील नागरिकांनी जनगणनेच्या नमुन्यात आपली जात आणि धर्म योग्य पद्धतीने नमूद करावा, यासाठी जनजागृती करणार आहेत. जनगणना नमुन्यात आवश्यक स्पष्टता मिळेपर्यंत हे अभियान सुरू ठेवण्यात येईल, अशी माहिती डॉ. जामदार यांनी दिली.
लिंगायत संस्कारांवरील पुस्तकाचे प्रकाशन
लिंगायत समाजातील आचार-विचार आणि संस्कार शुद्ध स्वरूपात समाजासमोर मांडण्याच्या उद्देशाने ‘लिंगायत धर्माच्या आचारपद्धती’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आल्याचेही डॉ. जामदार यांनी सांगितले.
बसवण्णांच्या तत्त्वांचे जतन, लिंगायत धर्माच्या स्वतंत्र आचार-विचारांची मांडणी आणि समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने आगामी काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





