बेळगाव लाईव्ह : चव्हाट गल्ली येथे झालेल्या भीषण अग्निकांडात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना दिसल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास केला जात आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथके कार्यरत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त एन. व्ही. बरमनी यांनी दिली आहे.
चव्हाट गल्ली अग्निकांडाच्या तपासाबाबत पोलीस उपायुक्त एन. व्ही. बरमनी यांनी माध्यम प्रतिनिधींना संदेश पाठविला आहे.
“प्रिय माध्यम मित्रांनो, चव्हाट गल्ली अग्निकांडाच्या तपासासाठी तीन पथके कार्यरत आहेत. पोलीस आयुक्त साहेब या प्रकरणातील तपासाच्या प्रगतीबाबत माहिती देतील. कृपया सहकार्य करा. अन्यथा तपासावर परिणाम होऊ शकतो आणि प्रकरणाची संवेदनशीलता बाधित होऊ शकते. धन्यवाद.”
या संदेशातून तपासाच्या गोपनीयतेचे आणि संवेदनशीलतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. तपासाची अधिकृत माहिती पोलीस आयुक्तांकडून देण्यात येणार असल्याचे बरमनी यांनी स्पष्ट केले आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या पार्श्वभूमीवर तपासाकडे लक्ष
अग्निकांडानंतर समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती संशयास्पदरीत्या परिसरात फिरताना दिसल्याची माहिती चर्चेत आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तपास सुरू असून, संबंधित व्यक्तीचा घटनेशी नेमका संबंध आहे का, याबाबत अधिकृत निष्कर्षाची प्रतीक्षा आहे.
तीन तपास पथकांकडून सुरू असलेल्या चौकशीची प्रगती पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्याकडून जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे तपासाबाबत अपूर्ण माहिती किंवा अंदाज प्रसारित न करता अधिकृत माहितीची प्रतीक्षा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
चव्हाट गल्ली अग्निकांडातील सहा जणांच्या मृत्यूचे सत्य समोर आणण्यासाठी सुरू असलेल्या तपासात पोलिसांकडून कोणती माहिती समोर येते, याकडे बेळगावकरांचे लक्ष लागले आहे.





