बेळगाव लाईव्ह : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सीमाभाग पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या श्री सुंदर गणेशमूर्ती स्पर्धा २०२६ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. गणेशोत्सवातील कलात्मक आणि सुंदर गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या स्पर्धेत वडगाव येथील अष्टविनायक नगर मंडळाने सामायिक महाविजेता पुरस्कार पटकावत बाजी मारली आहे.
या स्पर्धेत बेळगाव उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही विभागांतील गणेश मंडळांचे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. उत्तर विभागात कपिलेश्वर चौक तांगडी गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने उत्कृष्ट मूर्तीसाठी प्रथम क्रमांक पटकावला. तर दक्षिण विभागात अनगोळ येथील राजहंस गल्ली मंडळाने प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळवला आहे.
उत्तर विभागातील इतर विजेत्यांमध्ये रामलिंगखिंड गल्ली अशोक सम्राट चौक मंडळाने द्वितीय क्रमांक, श्री छत्रपती शिवाजी नगर येथील राजाधिराज संघाने तृतीय क्रमांक, जुनेगांधीनगर मारुती रोड येथील छत्रपती श्री शिवाजी चौक मंडळाने चतुर्थ क्रमांक आणि तानाजी गल्ली मंडळाने पाचवा क्रमांक पटकावला आहे.
दक्षिण विभागात धर्मवीर श्री छत्रपती संभाजी नगर वडगाव मंडळाने द्वितीय क्रमांक, हिंदवाडी येथील सुभाष मार्केट मंडळाने तृतीय क्रमांक, रयत गल्ली वडगाव मंडळाने चतुर्थ क्रमांक आणि शहापूर येथील भाजी मार्केट खडेबाजार मंडळाने पाचवा क्रमांक मिळवला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सीमाभाग पक्षातर्फे दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करून बेळगावातील गणेश मंडळांच्या कलात्मकतेला आणि गणेशमूर्ती सौंदर्याला सातत्याने प्रोत्साहन दिले जाते. या स्पर्धेमुळे बेळगावातील गणेशोत्सवाचा सांस्कृतिक दर्जा आणि कला गुण समोर आले असून सर्व विजेत्या मंडळांचे कौतुक केले जात आहे.





