बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात गणेशोत्सवाच्या काळात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली असून, रविवारी रात्री मंडोळी रोडवर एका तरुणाला बोलावून घेऊन त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर हल्लेखोर टोळक्याने घटनास्थळावरून पोबारा केला.
ही घटना रविवारी रात्री ९ ते १० च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण यापूर्वी जुगार अड्डा चालवत होता. रविवारी रात्री त्याला फोन करून मंडोळी रोडवर बोलावून घेण्यात आले.
त्यानंतर त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. जुन्या वादातून किंवा काटा काढण्याच्या उद्देशानेच हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच बेळगावचे पोलीस उपायुक्त एन. व्ही. बरमणी, बेळगाव ग्रामीणचे एसीपी मल्लणगौडा नायकरा यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.





