बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सवाच्या नावाखाली सध्या सुरू असलेला देखावा, कर्णकर्कश डीजेचा आवाज आणि पैशांची उधळपट्टी या विकृतीला बेळगावातील एका मंडळाने थेट छेद दिला आहे. आरपीडी क्रॉस महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गेल्या १४ वर्षांपासून एकाच मूर्तीचे पूजन करत आणि डीजे, फटाक्यांना फाटा देत पर्यावरणस्नेही उत्सवाचा एक वेगळा आणि आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.
बेळगावातील आरपीडी क्रॉस महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गेल्या १४ वर्षांपासून एकाच मूर्तीची प्रतिष्ठापना करत पर्यावरणस्नेही उत्सवाचा आदर्श निर्माण केला आहे. डीजे आणि फटाक्यांचा वापर न करता हा सण शांततेत व भक्तिभावाने साजरा केला जात आहे. १९५९ मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाने पूर्वीच्या विसर्जनादरम्यान होणाऱ्या जलप्रदूषणावर मात करण्यासाठी पुणे मॉडेलचा स्वीकार केला. २०१३ मध्ये अनगोळ येथील कलाकार मारुती पाटील यांच्याकडून १ लाख ११ हजार रुपये खर्चून १३ फुटांची फायबरची मूर्ती तयार करून घेण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी याच मूर्तीचे पूजन केले जाते आणि उत्सवानंतर मूर्ती मंडळाचे अध्यक्ष किरण सायनाक यांच्या शेडमध्ये सुरक्षित ठेवली जाते.
मंडळाचे अध्यक्ष किरण सायनाक यांनी सांगितले की, पीओपी मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण, फटाक्यांचे वायुप्रदूषण आणि डीजेच्या आवाजामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मुख्य फायबरच्या मूर्तीसमोर लहान मातीचा गणपती ठेवून पूजा केली जाते आणि शेवटच्या दिवशी जवळच्या विहिरीत साधेपणाने विसर्जन केले जाते. यावेळी मिरवणूक किंवा फटाके न फोडता भजनावर भर दिला जातो, तसेच गरजूंना आर्थिक मदतही केली जाते, असे किरण सायनाक यांनी म्हटले.
मंडळाचे पदाधिकारी सचिन चव्हाण यांनी सांगितले की, पीओपी मूर्ती पाण्यावर तरंगतात आणि त्यांचे विटंबन होते, हे रोखण्यासाठी १४ वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. दर दोन वर्षांनी या मूर्तीला रंगकाम करून नवीन वस्त्रे आणि पेठा चढवला जातो. स्वयंप्रेरणेने दिलेल्या देणग्यांवरच हा उत्सव साजरा केला जातो, अशी माहिती सचिन चव्हाण यांनी दिली.

या उपक्रमाचे कौतुक करताना स्थानिक नागरिक लक्ष्मी नारायण किणी यांनी सांगितले की, एकाच मूर्तीचे पूजन केल्याने पैशांची बचत होते आणि पर्यावरणाचे रक्षण होते. स्थानिक नागरिक पवन पदरा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आरपीडी क्रॉस मंडळाचा हा सण अत्यंत सोपा, अर्थपूर्ण आणि पूर्णपणे पर्यावरणस्नेही आहे, असे पवन पदरा यांनी म्हटले.
गणेशोत्सवाचा मूळ गाभा भक्ती आणि सामाजिक एकोप्यात आहे, हेच या उपक्रमातून सिद्ध होते. वाढत्या प्रदूषणाच्या काळात बेळगावच्या या मंडळाने दाखवलेला हा मार्ग इतरांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणारा आहे. उत्सवातील अनावश्यक खर्च टाळून तोच पैसा सामाजिक कार्यासाठी वापरता येतो, हेच या उपक्रमाने दाखवून दिले आहे. त्यामुळे आरपीडी क्रॉस मंडळाचा हा उपक्रम राज्यभरातील इतर मंडळांसाठी एक आदर्श मॉडेल ठरत आहे.





