बेळगाव लाईव्ह: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कन्नड रक्षण वेदिकेच्या मनोमिलनावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते ॲड. अमर येळ्ळूरकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘वन नेशन, वन लँग्वेज’च्या धोरणाला विरोध करत असाल, तर कर्नाटकातील ‘वन स्टेट, वन लँग्वेज’च्या भूमिकेलाही विरोध करावा, असे आवाहन त्यांनी केले.
माध्यमांमधून कन्नड रक्षण वेदिकेचे नारायण गौडा तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे आणि फारुकी यांची बैठक झाल्याची माहिती समोर आली. या बैठकीत केंद्र सरकारकडून हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून पुढे करण्याच्या प्रयत्नांना विरोध करण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
यावर प्रतिक्रिया देताना ॲड. अमर येळ्ळूरकर म्हणाले की, हिंदी ही मातृभाषा नसल्यामुळे ‘वन नेशन, वन लँग्वेज’ला विरोध करणाऱ्या नारायण गौडा यांनी हाच निकष कर्नाटकासाठीही लागू करावा.
“कर्नाटकात ‘वन स्टेट, वन लँग्वेज’ म्हणून केवळ कन्नड लादण्याऐवजी बेळगाव परिसरातील सुमारे २५ लाख मराठी भाषिकांचा विचार करावा,” असे येळ्ळूरकर यांनी म्हटले.

भाषिक अल्पसंख्याकांच्या अधिकारांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, ज्या भागात एखाद्या भाषिक अल्पसंख्याकांची लोकसंख्या लक्षणीय प्रमाणात आहे, तेथे त्यांना प्रशासनाशी आपल्या मातृभाषेत संवाद साधण्याचा आणि प्रशासकीय कामकाजात भाषिक अधिकार मिळण्याचा हक्क आहे.
“मराठी भाषिकांविरोधात आंदोलन करण्यासाठी बेळगावात येण्याऐवजी भाषिक अल्पसंख्याकांच्या अधिकारांचा विचार करा,” असा संदेश त्यांनी नारायण गौडा यांना दिला.
तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी आवाहन केले. ‘वन नेशन, वन लँग्वेज’ला विरोध करताना ‘वन स्टेट, वन लँग्वेज’लाही विरोध करा. ज्या-ज्या ठिकाणी भाषिक अल्पसंख्याक राहतात, तेथे त्यांना त्यांच्या भाषेत प्रशासकीय कामकाज करण्याचा अधिकार मिळण्यासाठी पाठिंबा द्या, अशी भूमिका येळ्ळूरकर यांनी मांडली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कन्नड रक्षक वेदिकेने हिंदी भाषेच्या कथित आक्रमणाविरोधात एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकात झालेल्या बैठकीत १० कलमी ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. बंगळुरू मध्ये मनसे नेते संदीप देशपांडे, मनसे सरचिटणीस योगेश परुळेकर आणि कन्नड रक्षक वेदिकेचे प्रदेशाध्यक्ष टी. ए. नारायण गौडा यांच्यात ही महत्त्वाची बैठक झाली आहे त्या पार्श्वभूमीवर बेळगाव आतून ही प्रतिक्रिया आली आहे.





