बेळगाव लाईव्ह : नागरिकांना आता महापालिकेचे जन्म आणि मृत्यू दाखले टपाल विभागामार्फत थेट घरीच उपलब्ध होणार आहेत. यासाठी महानगरपालिका आणि टपाल विभागात परस्पर सामंजस्य करार झाला आहे.
शुक्रवारी महानगरपालिका आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत महापालिका आयुक्त कार्तिक एम. आणि टपाल विभागाच्या बेळगाव विभागाच्या वरिष्ठ अधीक्षक आरुषी शर्मा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
नागरिकांनी जन्म किंवा मृत्यू दाखल्यासाठी अर्ज करताना टपाल सेवेसाठीचा पत्त्यासह संमती अर्ज जोडल्यास महापालिकेचा संबंधित विभाग दाखला पोस्टाने पाठवेल, असे महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी सांगितले. टपाल शुल्क भरून नागरिकांना घरीच दाखला मिळणार असून, यामुळे वेळ आणि खर्चाची बचत होईल, असे सांगत नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले.
याप्रसंगी टपाल विभागाच्या बेळगाव विभागाच्या वरिष्ठ अधीक्षक आरुषी शर्मा, महापालिकेचे पर्यावरण अभियंता व जन्म-मृत्यू नोंदणी अधिकारी अशोककुमार सज्जन, टपाल विभागाचे अधिकारी मारुती दोड्डमणी आणि अनंतशयन उपस्थित होते.





