बेळगाव लाईव्ह : बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीतील बांधकामांसाठी फ्लोअर स्पेस इंडेक्स (FSI) वाढविण्याच्या प्रस्तावाला संरक्षण संपदा महासंचालनालयाने (DGDE) मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव अंतिम अधिसूचनेसाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.
कॅन्टोन्मेंटच्या नागरी भागासाठी कमाल FSI 2.0 प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या इमारतींचा पुनर्विकास, नवीन बांधकामे आणि मालमत्तांच्या नियोजित विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा कॅन्टोन्मेंटमधील सुमारे २० हजार रहिवाशांना थेट किंवा अप्रत्यक्ष लाभ होण्याची अपेक्षा आहे.
FSI म्हणजे भूखंडाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत त्या भूखंडावर किती बांधकाम करता येईल, याचे प्रमाण. FSI वाढल्यास त्याच भूखंडावर अधिक बांधकाम क्षेत्र उपलब्ध होते.
यापूर्वी FSI वाढीचा प्रस्ताव पुणे येथील जनरल ऑफिसर कमांडिंग (GOC) यांनी प्रस्तावित FSI अधिक असल्याचे कारण देत नाकारला होता. त्यानंतर सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला. DGDEच्या मंजुरीनंतर आता अंतिम निर्णय संरक्षण मंत्रालयाच्या अधिसूचनेवर अवलंबून आहे.
संरक्षण मंत्रालयाकडून राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर सुधारित नियमांनुसार बांधकाम परवानग्यांची प्रक्रिया सुरू होऊ शकणार आहे.





