belgaum

बेळगावमध्ये पुन्हा रणजी सामन्याची रंगत; कर्नाटक-छत्तीसगड आमनेसामने

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगावच्या ऑटो नगर येथील कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या (KSCA) क्रिकेट स्टेडियमवर तब्बल दशकभरानंतर पुन्हा रणजी क्रिकेटची रंगत पाहायला मिळणार आहे. आगामी रणजी ट्रॉफी २०२६-२७ मोसमातील एलिट ग्रुप ‘ब’मधील कर्नाटक विरुद्ध छत्तीसगड सामना १७ ते २० जानेवारी २०२७ दरम्यान बेळगावमध्ये खेळविला जाणार आहे.

बीसीसीआयच्या २०२६-२७ देशांतर्गत क्रिकेट वेळापत्रकानुसार रणजी ट्रॉफीचा पहिला टप्पा ११ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२६, तर दुसरा टप्पा १७ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२७ असा होणार आहे. त्यानंतर ९ फेब्रुवारीपासून बाद फेरीला सुरुवात होईल आणि अंतिम सामना २७ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान होणार आहे.

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने बंगळुरूसोबतच म्हैसूर, हुबळी आणि बेळगावसारख्या मोफस्सिल भागांमध्ये उच्चस्तरीय क्रिकेट सामने आयोजित करून स्थानिक क्रिकेटपटूंना आणि क्रिकेटप्रेमींना मोठ्या सामन्यांचा अनुभव देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

 belgaum

२०१६ मध्ये रंगला होता ऐतिहासिक सामना

बेळगावच्या KSCA स्टेडियमवर यापूर्वी २०१६ मध्ये रणजी ट्रॉफीचे सामने झाले होते. २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०१६ दरम्यान गुजरात आणि पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात गुजरातचा सलामीवीर प्रियांक पांचाळने नाबाद ३१४ धावांची विक्रमी खेळी केली होती. गुजरातकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला होता.

यानंतर ७ ते १० डिसेंबर २०१६ दरम्यान गुजरात आणि तामिळनाडू यांच्यातही याच मैदानावर रणजी सामना झाला. या सामन्यात तामिळनाडूचा कर्णधार नव्हे तर फलंदाज कौशिक गांधीने २०२ धावांची खेळी केली होती. प्रियांक पांचाळने त्या मोसमात बेळगावमध्ये सलग प्रभावी कामगिरी करत तामिळनाडूविरुद्ध ११३ धावांची खेळी केली होती.

मैदानाची जय्यत तयारी

आता पुन्हा एकदा रणजी सामना बेळगावमध्ये होत असल्याने KSCA स्टेडियमवर खेळपट्टीसह मैदानाची तयारी सुरू झाली आहे. कर्नाटक आणि छत्तीसगड या दोन संघांमधील चार दिवसीय सामना १७ जानेवारीपासून रंगणार असून, बेळगावच्या क्रिकेटप्रेमींना देशातील सर्वोच्च देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटचा थरार प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे.

बेळगावमध्ये रणजी क्रिकेटचे पुनरागमन हे स्थानिक क्रिकेटप्रेमींसह उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठीही महत्त्वाचे ठरणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.