बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर व परिसरात अल्पसंख्याक समुदायातील मतदारांची नावे बेकायदेशीररीत्या वगळण्यात आल्याचा दावा करत सोशालिस्ट डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने (एसडीपीआय) रस्त्यावर उतरून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
सोमवारी बेळगाव येथे आयोजित भव्य निषेध मोर्चामध्ये निवडणूक आयोग आणि बीएलओ कर्मचाऱ्यांच्या संगनमतावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. संवैधानिक चौकटीचा अवमान करत निवडणूक यंत्रणा सत्ताधारी किंवा एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या तालावर नाचत असल्याचा आरोप नेत्यांनी केला.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर पावले उचलावीत, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले.
एका विशिष्ट वर्गाची मते बाद करण्यासाठी छापिल फॉर्म ७ अर्जांचा सर्रास गैरवापर सुरू असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. या संपूर्ण प्रकरणात संशयास्पद स्वाक्षऱ्या करून नावे वगळणाऱ्या बेळगावातील संबंधित बीएलओ अधिकाऱ्याला तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी लावून धरली.
या संपूर्ण आंदोलनात एसडीपीआयचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





