belgaum

खडे बाजारात अतिक्रमणाचा विळखा! वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराच्या मध्यवर्ती आणि अतिशय वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या खडे बाजार परिसरात रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची समस्या अत्यंत बिकट झाली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना रोजच नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

खडे बाजार परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना छोटे व्यापारी आणि फेरीवाल्यांनी अनधिकृतपणे सुमारे २० फुटांपर्यंतची जागा व्यापून आपला व्यवसाय थाटला आहे. परिणामी, रहदारीसाठी प्रत्यक्ष उपलब्ध असलेली रस्ता रुंदी प्रचंड आकुंचन पावली असून या परिसरात दिवसभर वारंवार तीव्र वाहतूक कोंडी होत आहे.

वाढती वाहनांची संख्या, बाजारात खरेदीसाठी येणारी मोठी गर्दी आणि त्यातच दुतर्फा झालेली बेकायदेशीर अतिक्रमणे यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्ता उरलेला नाही. शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या जीवघेण्या वर्दळीतून वाट काढणे जिकिरीचे ठरत आहे. महापालिका प्रशासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन केवळ वरवरची किंवा तात्पुरती कारवाई न करता कायमस्वरूपी आणि ठोस तोडगा काढावा, अशी आक्रमक मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे.

 belgaum

या समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना स्थानिक नागरिक विशाल देशपांडे यांनी सांगितले की, प्रशासनाच्या अनास्थेमुळे खडे बाजारातील व्यापारी आणि सामान्य जनता दोघेही वेठीस धरले जात आहेत.

प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून वाहतुकीला प्रत्यक्ष अडथळा ठरणाऱ्या सर्व बाबींवर कठोर पावले उचलत कायमस्वरूपी नियोजन करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.