बेळगाव लाईव्ह: खानापूर तालुक्यातील मोरब-गवळीवाडा गावालगत बेळगाव महानगरपालिकेचा कचरा डेपो उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याचा दावा करत ग्रामस्थांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे. गावापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर असलेल्या बैलूर हद्दीतील सुमारे २० एकर गायरान जमिनीवर कचरा डेपोसाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे वकील सुधीर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गवळीवाडा ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन अन्य कामात व्यस्त असल्याने ग्रामस्थांनी प्रभारी अधिकाऱ्याकडे निवेदन सादर केले.
ग्रामस्थांच्या निवेदनानुसार, गवळीवाडा गावात सुमारे ७० कुटुंबे असून जवळपास ४०० नागरिक वास्तव्यास आहेत. प्रस्तावित जागा सर्व्हे क्रमांक ३१ ए, बैलूर हद्दीत असून ती गावापासून केवळ १०० मीटर अंतरावर आहे. या ठिकाणी महानगरपालिकेच्या कचरा डेपोसाठी जागेची पाहणी करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
‘आमची जनावरं कुठे चारायची?’
गावातील अनेक कुटुंबे धनगर-गवळी समाजातील असून त्यांचा उदरनिर्वाह मोठ्या प्रमाणावर पशुपालनावर अवलंबून आहे. गावकऱ्यांकडे शेती किंवा अन्य व्यवसायाची साधने मर्यादित असल्याने गायरान जमीन त्यांच्या जनावरांच्या चारण्यासाठी महत्त्वाची असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
कचरा डेपो झाल्यास प्लास्टिक, कागद तसेच अन्य टाकाऊ वस्तू जनावरांच्या आहारात गेल्यास त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पशुधनाचे नुकसान होऊन पशुपालकांच्या उदरनिर्वाहावरही परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
शाळा आणि गावाच्या आरोग्याचाही प्रश्न
प्रस्तावित जागेच्या परिसरात शाळा असून लहान मुले तेथे शिक्षण घेत असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. कचरा डेपो झाल्यास दुर्गंधी, माशा-मच्छर, अस्वच्छता तसेच माती व पाण्याच्या प्रदूषणाचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
गावातील नागरिकांच्या आरोग्यावर तसेच दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने गावालगत कचरा डेपो उभारू नये, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
ग्रामपंचायतीनेही गायरान जमिनीबाबत कचरा डेपोसाठी कोणताही ठराव किंवा परवानगी देऊ नये, अशी मागणी केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यापूर्वी खानापूर तहसीलदार तसेच आमदार विठ्ठल सोमण्णा हलगेकर यांनाही निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘प्रस्ताव तातडीने रद्द करा’
सर्व्हे क्रमांक ३१ ए ही जागा मानवी वस्ती, शाळा, जनावरांच्या चराई क्षेत्रापासून दूर नसल्याने कचरा डेपोसाठी योग्य नाही, असा ग्रामस्थांचा दावा आहे. त्यामुळे या जागेची पाहणी व पुढील प्रक्रिया तातडीने थांबवून प्रस्ताव रद्द करावा आणि मानवी वस्ती, पशुधनाची चराई तसेच नैसर्गिक जलस्रोतांपासून दूर पर्यायी जागा निवडावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
‘गाव आधीच मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. त्यात गावापासून १०० मीटरवर कचरा डेपो झाल्यास आमच्या आरोग्याचा आणि जनावरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करावा,’ अशी मागणी ग्रामस्थांनी केली.





