बेळगाव लाईव्ह : मतदार याद्यांमधील गैरप्रकार आणि मतचोरीला खतपाणी घातल्याचा ठपका ठेवत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी बेळगावात जिल्हा व ग्रामीण काँग्रेस कमिटीतर्फे आक्रमक निदर्शने करण्यात आली.
सोमवारी आरटीओ सर्कल नजीकच्या संगोळी रायण्णा चौकाजवळील काँग्रेस कार्यालयापासून पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढला. केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ही रॅली कोर्ट चौकापर्यंत पोहोचली. या ठिकाणी आंदोलकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकृतीचे दहन करून तीव्र आक्रोष व्यक्त केला.
या प्रसंगी बोलताना आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ आपल्या पदावरून दूर होऊन देशवासीयांची क्षमा मागितली पाहिजे, असे ते म्हणाले.
आसाम, पश्चिम बंगाल, बिहार आणि महाराष्ट्रात नव्याने निवडणुका घेण्यात याव्यात आणि कर्नाटकात एसआयआर (SIR) प्रक्रिया पुनर्स्थापित करावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. तर केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना देशात लोकशाहीचा संकोच होत असल्याचा आरोप केला.
स्वायत्त संस्थांचा गैरवापर करून मतदारांची नावे बेकायदेशीरपणे हटवण्याचे मोठे कारस्थान रचले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर महिला काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आयोग भाजपच्या तालावर नाचत असल्याची टीका केली.
या आंदोलनात शहराध्यक्ष राजा सलीम काशम्मनवर, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बसवराज शेगावी यांच्यासह पक्षाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.





