बेळगाव लाईव्ह: बेंगळुरू येथील ‘द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वर्ल्ड कल्चर’ (आयआयडब्ल्यूसी) आर्ट क्लासेस अँड स्टुडिओच्या वतीने बेळगावात विद्यार्थ्यांच्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २ ते ४ ऑक्टोबर दरम्यान टिळकवाडीतील कलामहर्षी के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन भरवले जाणार आहे.
शुक्रवार, २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. या प्रसंगी चित्रकार शिरीष देशपांडे, छायाचित्रकार अमृत चरंतीमठ आणि रंगकर्मी डॉ. अरविंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या प्रदर्शनात १७ कलाकार सहभागी होत असून त्यांच्या विविध शैलीतील कलाकृती सादर केल्या जातील.
प्रदर्शनाचे संयोजन व मार्गदर्शन आयआयडब्ल्यूसीचे दृश्य कला संचालक संजय चापोळकर करत आहेत. मूळ बेळगावचे असणारे संजय चापोळकर यांनी आपले प्राथमिक कला शिक्षण बेळगावात एस. बी. सुतार आणि आर. आय. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले. आपल्या मूळ शहरात विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवणे हा एक विशेष योग असल्याचे संजय चापोळकर यांनी सांगितले.

सन १९४५ मध्ये स्थापन झालेली ‘द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वर्ल्ड कल्चर’ ही संस्था कला, तत्त्वज्ञान, साहित्य आणि संगीताच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या वतीने वर्षाला सुमारे १५० हून अधिक विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
संस्थेतील कला वर्ग गेल्या ४५ वर्षांपासून सुरू असून कै. एम. के. सुंकद यांनी याची सुरुवात केली होती. सध्या संजय चापोळकर या वर्गांचे संचालन करत आहेत. कलाप्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयआयडब्ल्यूसीच्या वतीने करण्यात आले आहे.





