बेळगाव लाईव्ह : गणेशपूर-लक्ष्मीनगर परिसरात बाहेरील भागातून येऊन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना व्यापारी परवाने देऊ नयेत, तसेच स्थानिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी गणेशपूर लक्ष्मीनगर व्यापारी क्षेमाभिवृद्धी संघाने केली आहे.
यासंदर्भात संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी बेनकनहळळी आणि हिंडलगा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात गणेशपूर तसेच परिसरात बाहेरील भागातील व्यक्ती येऊन विविध व्यवसाय सुरू करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना व्यवसायाच्या संधी कमी होत असून, स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य मिळावे, अशी मागणी संघाने केली आहे.
संघाचे अध्यक्ष मारुती भोसले यांनी सांगितले की, बेनकनहळी आणि हिंडलगा नगरपंचायत परिसरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन व्यापारी संघाची स्थापना केली आहे. स्थानिक नागरिकांना व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार आणि उदरनिर्वाहाची संधी मिळावी, हा संघाचा मुख्य उद्देश आहे.
एखाद्या अपार्टमेंट किंवा व्यावसायिक बांधकामासाठी परवानगी घेताना संबंधित मालकांना स्थानिकांना व्यवसायाची संधी देण्याबाबत सूचना कराव्यात, अशी मागणीही संघाने केली आहे. स्थानिक नागरिक छोटे-मोठे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. त्यामुळे त्यांना प्रशासन आणि संबंधित व्यावसायिकांनी सहकार्य करावे, असे बांदेकर यांनी म्हटले.

“आम्ही कोणाच्याही विरोधात नाही. सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याची आमची भूमिका आहे. मात्र स्थानिकांच्या काही मूलभूत समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी सरकारकडे निवेदन देऊन स्थानिकांना त्यांच्या परिसरातच व्यवसायाच्या संधी मिळाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,” असे बांदेकर यांनी स्पष्ट केले.
निवेदन स्वीकारताना नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर शक्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचेही संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या वेळी गणेशपूर-लक्ष्मीनगर व्यापारी संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.





