बेळगाव लाईव्ह : सोशल मीडियावर रौडगिरीचा दिखावा करत हातात शस्त्रे घेऊन व्हिडिओ बनवून दहशत निर्माण करणाऱ्या ‘रील्स रौड्यां’विरोधात बेळगाव जिल्हा पोलिसांनी कडक मोहीम सुरू केली आहे. अशा व्हिडिओंची सोशल मीडिया विभागामार्फत तपासणी करून संबंधितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पडताळली जात असून, गंभीर प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करत त्यांना कारागृहात पाठवले जात आहे.
यापूर्वी सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांचा सायबर विभागाच्या माध्यमातून शोध घेऊन स्वतःहून तक्रार दाखल करत कारवाई केली जात होती. आता पोलिसांनी रील्सच्या माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणांकडेही विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
काही जण रौड्यांप्रमाणे संवाद साधत, हातात शस्त्रे घेऊन रस्त्यावर फिरतानाचे व्हिडिओ तयार करतात. काही जण स्वतःची टोळी असल्याचा आभास निर्माण करून रौडगिरीवर आधारित चित्रपटांतील गाणी लावत हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करतात. अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.
सोशल मीडियातूनच एसपींचा इशारा
खानापूर तालुक्यातील एका तरुणाने दहशत निर्माण होईल अशा पद्धतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. पोलिसांनी त्याला ठाण्यात बोलावून समज दिली आणि त्याच्याकडून चूक कबूल करून घेतली.
जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी या प्रकरणातील मूळ व्हिडिओ तसेच पोलिसांच्या सूचनेनंतर संबंधित तरुणाने माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या माध्यमातून त्यांनी रील्सच्या नावाखाली रौडगिरी करणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे.
‘अण्णा’, ‘डॉन’, ‘बॉस’ म्हणवून घेत दहशत
पोलिसांच्या निरीक्षणात काही रील्समध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले तरुण स्वतःला ‘अण्णा’, ‘डॉन’ किंवा ‘बॉस’ म्हणून संबोधताना आढळले आहेत. विरोधकांना शिवीगाळ करणे, धमक्या देणे आणि ‘माझ्या वाटेला येणाऱ्याला सोडणार नाही’, अशा प्रकारची भाषा वापरणे, असे प्रकारही व्हिडिओंमधून केले जात आहेत.
हे व्हिडिओ व्हॉट्सॲप ग्रुपसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. त्यामुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून अशा व्यक्तींची ओळख पटवून त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले जात आहे.
संबंधित व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाते. आवश्यकतेनुसार न्यायालयाची परवानगी घेऊन अटकही केली जात आहे.
यरगट्टीतील तरुणावर कठोर कारवाई
अशाच प्रकारे रौडगिरीचा व्हिडिओ तयार करणाऱ्या यरगट्टी तालुक्यातील नुग्गानट्टी येथील बाळेश होंडप्पनवर पोलिसांनी कारवाई केली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या तरुणाला एक वर्षासाठी ताब्यात घेऊन बल्लारी मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रौडगिरीचे व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणांना पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली आहे. त्यांच्याकडून भविष्यात अशा प्रकारचे व्हिडिओ न करण्याबाबत चूक कबूल करणारे पत्रही लिहून घेण्यात आले आहे.
प्रत्येक पोलीस ठाण्यात सोशल मीडिया पथक
सोशल मीडियावर अपलोड होणाऱ्या व्हिडिओंवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी सोशल मीडियावरील व्हिडिओंचे निरीक्षण करून त्यातील आशय, व्हिडिओमागील उद्देश आणि संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी तपासत आहेत.
रौडगिरीचा दिखावा, शस्त्रांचे प्रदर्शन किंवा धमकीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात आता जिल्हा पोलिसांची नजर अधिक कडक झाली आहे.
रील्सच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ‘रील’ नव्हे, तर थेट कायद्याचा सामना करावा लागणार आहे.





