बेळगाव लाईव्ह :
बेळ्ळारी नाल्यावरील पुलांजवळ साचलेला गाळ हटवण्यासाठी शेतकरी संघटना, बेळ्ळारी नाला विकास समिती आणि स्थानिक ग्रामस्थांनी संयुक्तपणे स्वच्छता मोहीम हाती घेतली.
दरवर्षी गाळ साचल्यामुळे परिसरातील शेतीमध्ये पाणी साचून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने हा तात्पुरता उपाय करण्यात आल्याचे माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांनी सांगितले.
बेळ्ळारी नाल्यालगतची शेती पाण्यामुळे कुजण्याच्या स्थितीत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे पुलांखाली अडकलेला गाळ हटवून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याचे काम ग्रामस्थांच्या सहभागातून करण्यात येत असल्याचे हलगेकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी उपस्थित शेतकरी प्रतिनिधींनी सांगितले की, हा केवळ तात्पुरता उपाय असून मूळ प्रश्न कायम आहे. दरवर्षी सुमारे 500 ते 550 एकर शेती पाण्याखाली जाऊन खराब होते. गेली 40 वर्षे या समस्येमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून अनेकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
सरकार आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन बेळ्ळारी नाल्याचे कायमस्वरूपी काँक्रीटीकरण करावे, अशी मागणी शेतकरी संघटना आणि बेळ्ळारी नाला विकास समितीने केली. काँक्रीटीकरण झाल्यास पाण्याचा निचरा सुरळीत होऊन शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.





