belgaum

पाणीवळवणुकीवर खानापूर आमदारांनी भूमिका मांडावी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: मलप्रभा पाणीवळवणुकीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र एकीकरण समितीने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी या प्रकल्पाबाबत पुराव्यासह लिखित भूमिका जनतेसमोर मांडावी, अशी मागणी समितीने केली आहे. तसेच खानापूर तालुका किंवा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्याचा सुरेश जाधव यांना नैतिक अधिकार नसल्याचा दावा समितीने केला आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत खानापूर तालुक्यातील मलप्रभा पाणीवळवणूक, कळसा-भांडुरा, महादई आणि तालुक्याच्या हिताशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विविध विषयांवर ठराव मंजूर करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचेही ठरविण्यात आले.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना समितीचे मुख्य कार्यदर्शी आबासाहेब दळवी यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका करत कुसमळी प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतरच पाणीवळवणुकीबाबत चर्चा का सुरू झाली, याचा खुलासा करण्याची मागणी केली. राज्यात काँग्रेसचे सरकार असताना माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी हा प्रश्न उपस्थित करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता सुरेश जाधव यांनी समितीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केल्याची टीका त्यांनी केली.

 belgaum

दळवी म्हणाले की, महाराष्ट्र एकीकरण समितीने गेल्या चार ते पाच दशकांपासून कळसा-भांडुरा, महादई तसेच खानापूर तालुक्याच्या हिताला बाधक ठरणाऱ्या विविध प्रकल्पांना सातत्याने विरोध केला आहे. त्यामुळे समितीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा तिच्या पाठपुराव्याची माहिती घ्यावी.

आमदारांनी पुराव्यासह भूमिका जाहीर करावी

आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी संबंधित प्रकल्पाबाबत आतापर्यंत स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. जर केवळ पावसाचे पाणीच प्रकल्पाकडे वळविण्यात येणार असल्याचा त्यांचा दावा असेल, तर त्यासंदर्भातील अधिकृत कागदपत्रे व पुरावे जनतेसमोर सादर करून संभ्रम दूर करावा, अशी मागणी दळवी यांनी केली.

सर्वपक्षीय बैठक बोलविण्याचा ठराव

या प्रश्नावर माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, असा ठराव बैठकीत करण्यात आला. या बैठकीस महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार, पदाधिकारी तसेच माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी उपस्थित राहून आपापली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच मध्यवर्ती समितीने मुंबई किंवा दिल्ली दौऱ्यावेळी खानापूर समितीला विश्वासात घेऊन स्थानिक प्रतिनिधींनाही सहभागी करून घ्यावे. अन्यथा हा प्रश्न केवळ बेळगावपुरताच मर्यादित आहे का, याबाबत मध्यवर्ती समितीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.

‘हा प्रश्न संपूर्ण खानापूर तालुक्याचा’

समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी सांगितले की, खानापूर तालुक्यातील पाणी दुसऱ्या भागात वळविण्याचा मुद्दा हा केवळ महाराष्ट्र एकीकरण समितीचा नसून संपूर्ण तालुक्याच्या हिताचा आहे. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप टाळून सर्वपक्षीय बैठक घेऊन एकमताने भूमिका निश्चित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीस माजी आमदार दिगंबरराव पाटील, मुरलीधर पाटील, विलासराव बेळगावकर, जयराम देसाई, रणजीत पाटील, अभिजीत सरदेसाई, गोपाल पाटील, बाळासाहेब शेलार, पांडुरंग सावंत, बी. बी. पाटील, पुंडलिक रामचंद्र पाटील, रुक्कमाण्णा जुंझवाडकर, राजेंद्र कुलम, रमेश धबाले यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.