बेळगाव लाईव्ह : वाल्मिकी विकास निगम घोटाळ्याप्रकरणी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले काँग्रेसचे आमदार बी. नागेंद्र यांना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात सोमवारी पुन्हा मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. या निर्णयाच्या निषेधार्थ भाजपने मंगळवारी बेळगावातील कित्तूर राणी चन्नम्मा चौकात आंदोलन करत नागेंद्र यांना तातडीने मंत्रिमंडळातून हटविण्याची आणि घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.
कित्तूर राणी चन्नम्मा चौकात झालेल्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी सहभाग घेत राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. भाजपच्या जिल्हा संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात वाल्मिकी विकास निगमातील निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
घोटाळ्यात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर कोणताही राजकीय हस्तक्षेप न करता कठोर कारवाई करावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. यावेळी आंदोलनाला संबोधित करताना भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी राज्य सरकारवर भ्रष्टाचाराला संरक्षण देत असल्याचा आरोप केला. अनुसूचित समाजाच्या विकासासाठी राखीव निधीचा अपहार हा अत्यंत गंभीर प्रकार असून, आरोपांना सामोरे जात असलेले बी. नागेंद्र यांनी मंत्रीपदावर राहणे नैतिकतेला धरून नसल्याचे ते म्हणाले. त्यांना तातडीने मंत्रिमंडळातून हटवून निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

प्रकरणाची चौकशी स्वतंत्र यंत्रणेमार्फत करून दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनादरम्यान काँग्रेस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात माजी आमदार संजय पाटील, अरविंद पाटील, महांतेश दोड्डगौडर, भाजपचे जिल्हा व महानगर पदाधिकारी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, युवा मोर्चाचे सदस्य आणि मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.





