बेळगाव लाईव्ह : येळ्ळूर येथील शिवाजी विद्यालय हायस्कूलमध्ये मस्टर रोल तपासण्यावरून झालेल्या वादातून अध्यक्षाला मारहाण केल्याच्या आरोपातील दोन आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. साक्षीदारांच्या जबाबांमधील विसंगती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हा निकाल दिला.
या प्रकरणातील आरोपी प्रकाश परशुरामभाऊ नंदिहळ्ळी (५१) आणि सुहास प्रकाश हुद्दार (३५) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. प्रकाश नंदिहळ्ळी हे शिवाजी विद्यालयात अटेंडर म्हणून कार्यरत होते, तर सुहास हुद्दार हे पत्रकार आहेत. दोघेही बेळगाव येथील रहिवासी आहेत.
फिर्यादी विजय परशुरामभाऊ नंदिहळ्ळी हे विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष असून, समिती संचालित शिवाजी विद्यालयाची जबाबदारी पाहत होते. ८ जुलै २०१३ रोजी दुपारी शाळेतील स्टाफ मस्टर रोलची पाहणी करत असताना ‘मस्टर रोल तपासणारे तुम्ही कोण?’ या कारणावरून प्रकाश नंदिहळ्ळी यांनी वाद घालत मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला होता.
यानंतर इतर व्यक्तींना शाळेत बोलावून घेऊन लाकडी दांडा व लोखंडी रॉडने आपल्यावर आणि भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मुलावर हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला होता.
याप्रकरणी विजय नंदिहळ्ळी यांच्या फिर्यादीवरून बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११३/२०१३ दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून चार आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. मात्र, खटला सुरू असताना अरुण नंदिहळ्ळी आणि मोहीन फयीम पठाण यांचा मृत्यू झाल्याने त्यांना खटल्यातून वगळण्यात आले.
खटल्यादरम्यान न्यायालयात नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. मात्र, साक्षीदारांच्या जबाबांमध्ये आढळलेल्या विसंगती आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने प्रकाश नंदिहळ्ळी व सुहास हुद्दार यांची आरोपातून निर्दोष मुक्तता केली.
आरोपींच्यावतीने अॅड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.





