belgaum

“माझ्याने होईल का?” ते कमांडोपर्यंत.. गीतांजलीची जिद्दीची कहाणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : नऊ महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तब्बल ६० दिवसांचे खडतर कमांडो प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून बेळगावची गीतांजली शिवाजी जाधव घरी परतली. देशसेवेची वाट निवडणाऱ्या या लेकीच्या स्वागतासाठी खडक गल्लीतील नागरिक एकवटले आणि तिच्या यशाचा जल्लोष करण्यात आला.

खडक गल्लीतील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गीतांजली यांचा सत्कार केला. त्यानंतर नागरिकांनी त्यांचे गल्लीतून स्वागत करत त्यांना घरापर्यंत आणले. घराच्या उंबरठ्यावर पोहोचताच कुटुंबीयांनी औक्षण केले. फटाक्यांची आतषबाजी, हार घालून सत्कार आणि गोड भरवून आपल्या लेकीच्या यशाचा आनंद कुटुंबीयांनी साजरा केला. पण हा केवळ एका मुलीच्या घरी परतण्याचा क्षण नव्हता… ही होती एका लेकीने स्वतःच्या जिद्दीने गाठलेल्या शिखराची घरवापसी!

गीतांजलींचा प्रवास सोपा नव्हता. त्यांचे मूळ/मूलभूत प्रशिक्षण तब्बल ९ महिन्यांचे होते. या प्रशिक्षणानंतर त्यांनी विशेष कमांडो प्रशिक्षणासाठी स्वतःहून पुढाकार घेतला. हे कमांडो प्रशिक्षण तब्बल २ महिने म्हणजेच ६० दिवसांचे होते. या ६० दिवसांत शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारे अनेक कठीण टप्पे त्यांनी पार केले. ७२ तासांचे सर्व्हायव्हल प्रशिक्षण… अवघ्या एक लिटर पाण्यावर टिकून राहण्याचे आव्हान… ४० फूट उंचीवरून पाण्यात उडी… वजन आणि रायफल घेऊन २० किलोमीटरपर्यंत चालणे… आणि रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत १६ किलोमीटर धावणे!

 belgaum

ही आव्हाने ऐकायलाही कठीण वाटतात. प्रत्यक्षात ती पूर्ण करणे तर त्याहून मोठे आव्हान. एका क्षणी “आपल्याकडून हे होणार नाही” असाही विचार गीतांजलींच्या मनात आला. मात्र, कुटुंबाचा विश्वास आणि स्वतःची जिद्द यामुळे त्यांनी हार मानली नाही. हजारीबाग, झारखंड येथे झालेल्या या विशेष प्रशिक्षणात एकूण ९५ जण सहभागी झाले होते. त्यामध्ये सहा मुली होत्या. त्यापैकी गीतांजलींसह दोन मुलींना ‘BI’ ग्रेडिंग मिळाले.

या प्रवासाची सुरुवात मात्र गीतांजलींच्या स्वतःच्या इच्छेतून झाली. कमांडो कोर्ससाठी त्यांचे नाव नियोजित नसतानाही त्यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त करून प्रशिक्षणात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वडिलांची आणि काकांचीही तीव्र इच्छा होती की गीतांजलीने हे आव्हान स्वीकारावे. गीतांजलींच्या या यशामागे कुटुंबासोबतच खडक गल्लीतील नागरिक आणि ज्येष्ठांचेही योगदान आहे. माजी नगराध्यक्ष हिरामणी रणोजीराव जाधव यांच्यासह कुटुंबातील ज्येष्ठांची प्रेरणा आणि गल्लीतील नागरिकांचा पाठिंबा गीतांजलीला मिळाला.

यावेळी उपस्थितांनी गीतांजलींच्या यशाचे कौतुक करत बेळगावच्या इतर युवतींनीही देशसेवेच्या क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन केले. गीतांजलींचा संदेशही स्पष्ट आहे— “प्रयत्न केला तर सर्व काही शक्य आहे.” कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी हा एकमेव पर्याय नसून देशसेवेची संधीही मुलींनी स्वीकारावी, असे त्या सांगतात.

नऊ महिन्यांच्या मूलभूत प्रशिक्षणापासून सुरू झालेला आणि त्यानंतरच्या ६० दिवसांच्या खडतर कमांडो प्रशिक्षणातून अधिक मजबूत झालेला गीतांजलींचा हा प्रवास आज खडक गल्लीपुरता मर्यादित राहिलेला नाही. एका गल्लीतल्या लेकीने जिद्दीची नवी ओळख निर्माण केली आहे… आणि तिच्या या यशाचा अभिमान आता संपूर्ण बेळगावला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.