belgaum

दिल्ली दरबारी अनिल बेनके यांची ताकद दाखवणारी भेटीगाठी!

0
 belgaum

बेळगाव : बेळगावचे माजी आमदार, कर्नाटक भाजपचे उपाध्यक्ष आणि मराठा समाजाचे प्रमुख नेते अनिल बेनके यांनी दिल्ली दौऱ्यात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वातील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्याने बेळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

भाजपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री बी. एल. संतोष यांच्यानंतर बेनके यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची दिल्ली मुक्कामी भेट घेतली. त्याआधी त्यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचीही भेट घेऊन विविध राजकीय आणि संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली.

या भेटींमध्ये केवळ वैयक्तिक राजकारण नव्हे, तर कर्नाटकातील भाजपची संघटनात्मक परिस्थिती, बेळगाव जिल्ह्यातील पक्षाची स्थिती, स्थानिक राजकीय समीकरणे आणि मतदारसंघातील विविध प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

 belgaum

तिकीट कापल्याची खंत थेट राष्ट्रीय अध्यक्षांसमोर

मागील विधानसभा निवडणुकीत अनिल बेनके यांचे तिकीट कापण्यात आले होते. आपण पक्षासाठी काम करत असताना आणि बेळगावचे प्रतिनिधित्व करत असताना तिकीट नाकारण्यामागचे स्पष्ट कारण आपल्याला देण्यात आले नाही, अशी खंत बेनके यांनी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासमोर व्यक्त केल्याचे समजते.

विशेषतः भाजपमधील एकमेव मराठा आमदार म्हणून आपली भूमिका असतानाही आपल्यावर अन्याय का झाला, हा मुद्दा त्यांनी नेतृत्वाच्या निदर्शनास आणून दिला.

‘यापुढे अन्याय होऊ देणार नाही’

बेनके यांच्या या भूमिकेची राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी गांभीर्याने दखल घेतल्याचे सांगण्यात येते. यापुढे पक्षात कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, तसेच मागील निर्णयामुळे झालेल्या राजकीय नुकसानीची योग्य ती भरपाई किंवा जबाबदारी दिली जाईल, असे आश्वासन नितीन नवीन यांनी दिल्याचे समजते.

या आश्वासनामुळे बेनके समर्थकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिल्लीतील भेटींचे राजकीय संकेत काय?

अनिल बेनके यांची नितीन नवीन आणि प्रल्हाद जोशी यांच्यासोबत झालेली भेट केवळ औपचारिक भेट मानली जात नाही. बेळगाव जिल्ह्यातील भाजप संघटना मजबूत करण्यासाठी बेनके यांच्यावर आगामी काळात मोठी जबाबदारी सोपवली जाणार का? याबाबत राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

बेनके हे बेळगावच्या राजकारणातील परिचित नाव असून मराठा समाजासह स्थानिक पातळीवरील त्यांचा संपर्क आणि पक्ष संघटनेतील अनुभव भाजपसाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे दिल्लीतील या भेटींनंतर बेनके यांना पक्षात नवी राजकीय जबाबदारी किंवा महत्त्वाचे संघटनात्मक पद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, आगामी काळात कर्नाटकातील भाजपची संघटनात्मक बांधणी, बेळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आणि मराठा समाजातील पक्षाचा प्रभाव या तिन्ही आघाड्यांवर बेनके यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.

त्यामुळे ‘तिकीट कापल्यानंतर बाजूला पडलेले बेनके आता पुन्हा केंद्रस्थानी येणार का?’ हा प्रश्न बेळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

दिल्लीतील या भेटींमधून नेमकी कोणती राजकीय जबाबदारी बेनके यांच्या वाट्याला येते, याकडे आता बेळगावसह संपूर्ण कर्नाटकातील भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.