बेळगाव : कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम खाते मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या बंगळुरूतील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ED ने आज अचानक छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. EDच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या निवासस्थानी महत्त्वाची कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित बाबींची तपासणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
ही कारवाई अबकारी विभागातील कथित गैरव्यवहाराच्या तपासाशी संबंधित असल्याचे वृत्त आहे. सतीश जारकीहोळी यांचे नातेवाईक आणि अबकारी विभागातील अधिकारी मंजुनाथ यांच्याशी संबंधित प्रकरणाचा तपास EDकडून यापूर्वीपासून सुरू आहे.
या प्रकरणाच्या तपासात कथित अनधिकृत बार परवान्यांचे वाटप, आर्थिक गैरव्यवहार तसेच मनी लाँड्रिंगशी संबंधित संशयास्पद व्यवहारांचा तपास केला जात असल्याचे सांगितले जात आहे. सतीश जारकीहोळी यांच्यावर 18 अनधिकृत बार लायसन्स देण्यास मदत केल्याचा आरोप असल्याचेही समोर आले आहे. मात्र, या आरोपांबाबत तपास यंत्रणेकडून अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये झालेल्या ‘अ हिंद’ मेळाव्यात सतीश जारकीहोळी यांच्या अनुपस्थितीची जोरदार चर्चा झाली होती. या चर्चेनंतर अवघ्या दोन दिवसांत त्यांच्या निवासस्थानी EDची धाड पडल्याने या कारवाईकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे.
जारकीहोळी यांच्या अनुपस्थितीची चर्चा आणि त्यानंतर झालेली EDची कारवाई हा योगायोग आहे की या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्यामुळे EDची ही कारवाई सध्या कर्नाटकाच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
यापूर्वीही या प्रकरणाच्या अनुषंगाने विविध ठिकाणी तपास आणि झडतीची कारवाई करण्यात आली होती. बंगळुरू, बेळगाव आणि महाराष्ट्रासह सुमारे 15 ठिकाणी EDकडून तपासणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
तसेच, यापूर्वी कथित तीन कोटी रुपयांच्या विदेशी चलनाशी संबंधित व्यवहार तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर विदेशी गुंतवणूक, आर्थिक व्यवहार आणि कथित मनी लाँड्रिंगच्या संशयाचा EDकडून तपास केला जात असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, EDच्या या छाप्यात नेमके काय आढळले, कोणती कागदपत्रे किंवा आर्थिक नोंदी तपासण्यात आल्या आणि पुढील कारवाई काय होणार, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
सार्वजनिक बांधकाम खाते मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी झालेल्या या ED कारवाईमुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी काळात या तपासातून कोणते नवे खुलासे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





