बेळगाव लाईव्ह : हिंडलगा, मण्णूर आणि आंबेवाडी परिसरातून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. नदीपात्रात साचलेला कचरा आणि निर्माल्यामुळे नदीचे स्वरूप गटारासारखे झाले आहे.
मार्कंडेय नदीला आंबेवाडी नदी म्हणूनही ओळखले जाते. या नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी प्लास्टिक, घरगुती कचरा आणि इतर टाकाऊ वस्तू टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यातच धार्मिक कार्यक्रमांनंतर नदीपात्रात मोठ्या प्रमाणात निर्माल्य टाकले जात असल्याने प्रदूषणाची समस्या अधिक गंभीर बनत आहे. नदीकाठावर कचरा टाकू नये, अशा सूचना देणारे फलक लावण्यात आले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून फलकांच्या आसपासच कचरा टाकला जात असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, श्रावण महिन्यापासून विविध धार्मिक सण आणि उत्सवांची मालिकाच सुरू होते. श्रावण महिन्यातील व्रतवैकल्ये आणि पूजाअर्चा, त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्रोत्सवातील दुर्गामाता पूजन आणि पुढे दिवाळी अशा अनेक सणांच्या काळात घरोघरी तसेच सार्वजनिक स्तरावर मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या पूजाविधींमध्ये फुले, हार, पाने, नारळ आणि इतर पूजासाहित्याचा वापर होतो. कार्यक्रम संपल्यानंतर तयार होणारे निर्माल्य योग्य ठिकाणी जमा करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी अनेकांकडून ते बिनदिक्कतपणे नदीपात्रात टाकले जाते. शिवाय निर्मला सोबतच प्लास्टिक देखील नदीपात्रातच टाकले जाते. धार्मिक श्रद्धेपोटी केलेल्या पूजाविधींचा शेवट अशा प्रकारे नदी प्रदूषित करण्यात होणे, ही चिंतेची बाब आहे.
धार्मिक परंपरा आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. निर्माल्य नदीत विसर्जित करण्याऐवजी त्याचे स्वतंत्र संकलन करून कंपोस्ट खतनिर्मितीसारख्या पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करता येऊ शकतो. यासाठी ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाने निर्माल्य संकलनाची व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नागरिकांनीही धार्मिक कार्यक्रमांनंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची आणि निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.

नदीपात्रात कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्यासाठी केवळ सूचना फलक लावून उपयोग होणार नाही. हिंडलगा ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाने नदीपात्राची नियमित स्वच्छता करावी, कचरा टाकण्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी गरज व्यक्त होत आहे. सण-उत्सवांच्या काळात निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि जनजागृती मोहीम राबविल्यास नदीत जाणारा कचरा कमी होण्यास मदत होऊ शकते.
नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून परिसराच्या पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग आहे. तिचे अस्तित्व आणि नैसर्गिक स्वरूप टिकवण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे जितके आवश्यक आहे, तितकीच नागरिकांचीही सहभागाची भूमिका महत्त्वाची आहे. धार्मिक श्रद्धा जपत पर्यावरणाचे रक्षण करण्याची जाणीव प्रत्येकाने ठेवली, तरच मार्कंडेय नदीला गटारगंगेचे आलेले स्वरूप बदलण्यास मदत होईल.




