belgaum

हक्कांसाठी बेळगावातील सफाई कर्मचाऱ्यांचा एल्गार

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवरून प्रशासनाविरोधातील नाराजी पुन्हा एकदा समोर आली असून हक्कपत्रे, निवासी क्वार्टर्स आणि इतर मूलभूत मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, या मागणीसाठी सफाई कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. १५ ऑगस्टपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निवृत्त सफाई कर्मचाऱ्यांना निवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, बेळगावात अद्याप केवळ आश्वासनांवरच बोळवण होत असल्याची टीका संघटनेचे प्रमुख सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी समितीचे सदस्य विजय निरगट्टी यांनी केली. सुवर्णसौध अधिवेशन आणि सफाई कर्मचारी दिनी आंदोलन करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही महापालिका आयुक्तांकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने कर्मचाऱ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक वाघेला यांनी सांगितले की, महानगरपालिका हद्दीत गेली तीन दशके वास्तव्यास असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना निवासी क्वार्टर्स आणि हक्कपत्रे देण्याचा विषय अद्याप प्रलंबित आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत अनुकूल आदेश दिल्यानंतरही महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षभरात कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

 belgaum

एकूण अर्जांपैकी केवळ २५ जणांनाच हक्कपत्रे मिळाली असून उर्वरित २५३ सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. दावणगेरेच्या धर्तीवर बेळगावातील सफाई कर्मचाऱ्यांसाठीही निवासी क्वार्टर्स उभारण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

१५ ऑगस्टपर्यंत सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर कित्तूर चन्नम्मा चौकात संघटनेचे मानद अध्यक्ष मुनिस्वामी भंडारी यांच्या नेतृत्वाखाली भव्य धरणे सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा संघटनेने जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.