बेळगाव लाईव्ह : बेळगाव आणि गोवा दरम्यान तसेच रेल्वे सेवा वाढविण्यासह हुबळी-लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) एक्स्प्रेसला अतिरिक्त डबे जोडण्याची मागणी करत ट्रेडर्स कौन्सिल, बेळगाव क्लॉथ सिल्क अँड टेक्सटाईल मर्चंट्स असोसिएशन (BCMA) यांनी मंगळवारी रेल्वे प्रशासनाला सविस्तर निवेदन सादर केले. दक्षिण पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष यांनाही या निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.
ट्रेडर्स कौन्सिलचे अध्यक्ष तथा दक्षिण पश्चिम रेल्वेचे माजी डीआरयूसीसी सदस्य सतीश तेंडोलकर यांनी रेल्वे स्थानकावर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, बेळगावच्या व्यापार, उद्योग, पर्यटन आणि वैद्यकीय क्षेत्राच्या विकासासाठी रेल्वे संपर्क अधिक सक्षम होणे अत्यावश्यक आहे.
मुंबईसाठी धावणाऱ्या 17317/17318 ट्रेनला अतिरिक्त डब्यांची मागणी
हुबळी-एलटीटी (17317/17318) एक्स्प्रेसला वर्षभर प्रचंड गर्दी असल्याने स्लीपर वर्गाचे आरक्षण सहज मिळत नाही. त्यामुळे किमान चार स्लीपर कोच आणि एक एसी 3-टायर कोच वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, या ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करून बेळगाव येथे रात्री सुमारे 8 वाजता आगमन होईल, अशी वेळ निश्चित करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यामुळे व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तेंडोलकर यांनी सांगितले की, रेल्वेत जागा न मिळाल्यामुळे अनेक प्रवाशांना खासगी लक्झरी बसचा पर्याय स्वीकारावा लागतो. सणासुदीच्या काळात आणि आठवड्याच्या शेवटी या बसचे भाडे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडतो. रेल्वेत अतिरिक्त डबे जोडल्यास हा ताण कमी होईल आणि रेल्वेचे उत्पन्नही वाढेल.
बेळगाव-गोवा दरम्यान दररोज इंटरसिटी ट्रेन सुरू करण्याची मागणी
बेळगाव आणि गोवा यांच्यातील आर्थिक, शैक्षणिक, पर्यटन, वैद्यकीय आणि सांस्कृतिक संबंध लक्षात घेऊन दररोज सकाळी 6 ते 6.30 वाजण्याच्या दरम्यान बेळगावहून वास्को-द-गामा येथे जाणारी इंटरसिटी/डीईएमयू/एमईएमयू प्रवासी ट्रेन सुरू करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. ही ट्रेन संध्याकाळी परत आल्यास व्यापारी, सरकारी कर्मचारी, विद्यार्थी आणि अन्य प्रवाशांना एकाच दिवशी प्रवास करून कामे पूर्ण करता येतील, असे संघटनेचे म्हणणे आहे.

याशिवाय, सध्या सुरू असलेली साप्ताहिक बेळगाव-गोवा एक्स्प्रेस दररोज धावणारी एक्स्प्रेस सेवा करावी, आणखी एक इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करावी तसेच विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतरही प्रवासाचा वेळ कमी झालेला नसल्याने अनावश्यक विलंब टाळून प्रवास अधिक जलद करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी
बेळगाव-गोवा मार्गावरील रेल्वे स्थानकांवर स्वच्छता, प्रशस्त प्रतीक्षागृहे, डिजिटल माहिती प्रणाली आणि दर्जेदार केटरिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
प्रदेशाच्या विकासाला चालना मिळेल
या मागण्या मान्य झाल्यास कर्नाटक आणि गोवा या दोन्ही राज्यांतील पर्यटन, व्यापार, उद्योग, शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्राला मोठी चालना मिळेल. तसेच प्रवाशांची संख्या वाढून भारतीय रेल्वेच्या महसुलातही वाढ होईल, असा दावा व्यापारी संघटनांनी केला आहे.
रेल्वे प्रशासनाने या मागण्यांचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ट्रेडर्स कौन्सिल आणि बेळगाव क्लॉथ सिल्क अँड टेक्सटाईल मर्चंट्स असोसिएशनने व्यक्त केली आहे.यावेळी मुकेश संघवी,मुकेश खोडा, एल एस छापरू, नितेश जैन, अरुण कुलकर्णी यांच्यासह व्यापारी उपस्थित होते. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह वरिष्ठ रेल्वेच्या अधिकाऱ्याने देखील निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे





