बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील उपनोंदणी कार्यालयात स्वतःला मालमत्तेचा मूळ मालक असल्याचे भासवून दुसऱ्याची मालमत्ता विक्री केल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
मार्केट पोलीस ठाण्यात रफीक इमाम शहापूरकर (वय 57, रा. कचेरी गल्ली, उचगाव, बेळगाव) यांनी 4 जानेवारी 2025 रोजी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या मालकीची मालमत्ता बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करून विकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता.
त्यानुसार मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 06/2025 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 419, 465, 468, 471 आणि 474 अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी कागदपत्रांची पडताळणी केली असता, खलंदर गुलाब पाटील (वय 53, रा. अनगोळ गल्ली, उचगाव, बेळगाव) याने फिर्यादीच्या चुलत्याच्या नावाने स्वतःलाच मालमत्तेचा मूळ मालक असल्याचे भासवत उपनोंदणी कार्यालयात हजेरी लावल्याचे उघड झाले.

आरोपीने खऱ्या मालकाच्या जागी बसून वेबकॅमेऱ्यासमोर छायाचित्र काढले, अंगठ्याचा ठसा दिला आणि संबंधित मालमत्तेचा खरेदी-विक्री दस्त (सेल डीड) करून ती इतर व्यक्तीच्या नावावर नोंदणी करून दिल्याचे तपासात स्पष्ट झाले. या प्रकारामुळे फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी आरोपीला 3 ऑगस्ट 2026 रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
ही कारवाई मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची, पोलीस उपनिरीक्षक एच. एल. केरूर तसेच त्यांच्या पथकाने केली. त्यांच्या कामगिरीचे पोलीस आयुक्त, बेळगाव शहर आणि डीसीपी यांनी कौतुक केले आहे.





