बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या सांस्कृतिक परंपरेचा ठसा आता सातासमुद्रापारही उमटत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील बे एरिया परिसरातील प्लेझन्टन येथे रविवारी (२ ऑगस्ट) सायंकाळी सादर झालेल्या ‘वाऱ्यावरची वरात’ या नाट्यप्रयोगाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रयोग हाऊसफुल्ल केला.
‘बे फ्रेंड्स’ यांच्या आयोजनाखाली आणि ‘कुंकु प्रॉडक्शन्स’च्या निर्मितीत विलो रोडवरील जय गणेश स्टुडिओ येथे हा प्रयोग रंगला. पु. ल. देशपांडे यांच्या मूळ लेखनावर आधारित या नाट्याविष्काराचे संपादन मेधा मराठे यांनी केले असून दिग्दर्शन जगदीश कुंटे यांनी केले.
या प्रयोगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बेळगाव, नाशिक आणि कॅलिफोर्निया येथील कलाकारांचा सहभाग. विशेषतः कुंटे आणि कुलकर्णी कुटुंबातील सदस्यांनी या नाट्यप्रयोगात विविध भूमिका साकारत रंगत आणली.
प्रयोगाच्या सुरुवातीला भालचंद्र कुंटे यांनी बेळगावचे कवी अविनाश ओगले यांच्या निवडक विडंबन कविता सादर केल्या. भूगोलाच्या बाई, सौभाग्यवतीला ताप म्हणालो, पुण्याचे प्रदूषण, मिसळ चापतो तर्रीची, कंट्रोल झेड तसेच कुसुमाग्रजांच्या ‘कणा’चे विडंबन यांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

मध्यंतरानंतर सादर झालेल्या ‘वाऱ्यावरची वरात’ या बहारदार प्रयोगात मंदार, वीणा, अपूर्वा, नील, भालचंद्र, महिमा, नीता, मिलिंद आणि जगदीश कुंटे, तसेच निहार, स्वप्नाली, उर्वी कुलकर्णी, अजित रानडे आणि आझाद दहिया यांनी भूमिका साकारल्या. पार्श्वसंगीत अमेय पोतदार यांचे, तर निवेदन प्रणाली उबाळे यांनी केले.
बे एरियातील मराठी रसिकांनी प्रयोगाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावत प्रत्येक प्रसंगाला टाळ्या आणि हास्यकल्लोळाने दाद दिली. त्यामुळे संपूर्ण सभागृह उत्साहाने दुमदुमून गेले.
तीन पिढ्यांचा अनोखा सहभाग
या नाट्यप्रयोगाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांनी एकत्र रंगमंच गाजवला. दिग्दर्शक जगदीश कुंटे यांनी पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारली, त्यांचे चिरंजीव मंदार कुंटे यांनी सूत्रधाराची भूमिका निभावली, तर मंदार यांचा मुलगा नील कुंटे याने पाताडे सायकल मार्टच्या प्रतिनिधीची भूमिका साकारत तीन पिढ्यांचा अनोखा संगम रंगमंचावर घडवला.
प्रयोग यशस्वी करण्यासाठी हेमाली गोंधळेकर आणि ‘बे फ्रेंड्स’च्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. अमेरिकेतील मराठी रंगभूमीवर बेळगावच्या कलाकारांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची छाप पाडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





