belgaum

चारित्र्यावर संशय घेत पतीकडून पत्नीची हत्या

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दारूच्या नशेत पतीने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना बेळगाव शहरातील हनुमाननगर येथे घडली आहे. अश्विनी हेगडे असे मृत महिलेचे नाव असून, पत्नीच्या हत्येच्या आरोपावरून तिचा पती विठ्ठल हेगडे याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. दसरा सणाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

धारवाड जिल्ह्यातील चिक्कमल्लिगवाड येथील अश्विनी हेगडे आणि बैलहोंगल तालुक्यातील विठ्ठल हेगडे यांचा सुमारे दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर उदरनिर्वाहासाठी हे दाम्पत्य बेळगाव शहरात स्थायिक झाले. त्यांना दोन मुले असून, कुटुंबाचा संसार सुरू असतानाच गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे.

विठ्ठल हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. याच कारणावरून त्यांच्या संसारात तणाव निर्माण झाला होता, अशी माहिती मिळाली आहे.

 belgaum

दसरा सणाच्या निमित्ताने अश्विनी आपल्या माहेरी गेल्या होत्या. आजारी असलेल्या सासऱ्यांना जेवण देण्यासाठी त्या घरी आल्या असताना ही दुर्दैवी घटना घडली. यावेळी दारूच्या नशेत असलेल्या विठ्ठलने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर त्याने अश्विनी यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्या आईने केला आहे.

घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पत्नीच्या हत्येच्या आरोपावरून विठ्ठल हेगडे याला अटक करण्यात आली असून, याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दहा वर्षांच्या संसाराचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने दोन मुलांच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपले आहे. दसऱ्याच्या सणादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे हनुमाननगर परिसरात शोककळा पसरली असून, दोन्ही मुलांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.