बेळगाव लाईव्ह : सीमाभागातील गणेशोत्सवाच्या आगमनापूर्वी ढोल-ताशा पथकांकडून वाद्यपूजन आणि सरावाचा शुभारंभ पारंपरिक पद्धतीने करण्याची परंपरा आहे. याच परंपरेनुसार श्री शिवशंभू ढोल-ताशा पथक, चव्हाट गल्ली, बेळगाव यांच्या वतीने जालगार मारुती मंगल कार्यालयात वाद्यपूजनाचा सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
यावेळी ढोल, ताशा आणि इतर पारंपरिक वाद्यांना दैवी स्वरूप मानून गंध, फुले आणि अक्षता अर्पण करून विधिवत पूजा करण्यात आली. आरतीनंतर ढोल-ताशांच्या गजरात पथकाच्या सरावाला सुरुवात करण्यात आली. या उत्साहपूर्ण सोहळ्याने आगामी गणेशोत्सवाच्या जल्लोषाची नांदी झाली.
कार्यक्रमाला माजी आमदार अनिल बेनके यांच्यासह गजानन मिसाळे, प्रताप मोहिते, उत्तम नाकाडी, दिगंबर पवार, विश्वजीत हसवे, सुनील जाधव, भास्कर चव्हाण, बाळू नाईक, शंकर कांबळे, श्रीनाथ पवार, रघु उर्विन, प्रफुल्ल शिरवळकर तसेच श्री शिवशंभू ढोल-ताशा पथकाचे अध्यक्ष पवन किल्लेकर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यंदाच्या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पथकातील दहावी, बारावी व इतर परीक्षांमध्ये ८० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
गेल्या दहा वर्षांपासून श्री शिवशंभू ढोल-ताशा पथक बेळगाव शहरासह सीमाभागातील विविध ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने आपली कला सादर करत आहे. विशेष म्हणजे पथकाला मिळणाऱ्या उत्पन्नातून खर्च वजा जाता उर्वरित रकमेतील काही हिस्सा दरवर्षी समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी खर्च केला जातो. कला, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधणारे हे पथक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
यंदाच्या वाद्यपूजन सोहळ्यात पथकातील प्रत्येक कार्यकर्त्याचाही मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. शिस्त, संघभावना आणि सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना माजी आमदार अनिल बेनके म्हणाले, “श्री शिवशंभू ढोल-ताशा पथकाचा हा केवळ वाद्यपूजनाचा कार्यक्रम नसून युवकांसाठी प्रेरणा देणारा संस्कारसोहळा आहे. गणेशोत्सवापूर्वी वाद्यांची पूजा करून सरावाला सुरुवात करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. बेळगावातील झांज पथकाच्या परंपरेची सुरुवातही चव्हाट गल्लीतूनच झाली असून, ही सांस्कृतिक परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे मोठे कार्य हे पथक करत आहे.”
पारंपरिक वाद्यांचे जतन, युवकांमध्ये शिस्त व संघभावना रुजविणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करत हा वाद्यपूजन सोहळा उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.





