बेळगाव लाईव्ह : साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीच्या गोविंदराम सेक्सरिया विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), बेळगाव येथे स्वायत्ततेअंतर्गत शिक्षण घेतलेल्या पहिल्या पदव्युत्तर (एम.एस्सी.) बॅचचा निकाल गुरुदेव रानडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात जाहीर करण्यात आला. पहिल्याच बॅचने उत्कृष्ट निकालाची नोंद करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप पाडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.के.ई. सोसायटीचे उपाध्यक्ष प्रा. एस. वाय. प्रभू होते. प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटीचे सचिव मधुकर सामंत उपस्थित होते. कीथ मचाडो यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अभय सामंत तसेच परीक्षा नियंत्रक प्रा. एम. एस. नागसुरेश उपस्थित होते.
प्रारंभी परीक्षा नियंत्रक प्रा. एम. एस. नागसुरेश यांनी निकालाची घोषणा केली. स्वायत्ततेतील पहिल्याच पदव्युत्तर बॅचने विविध विभागांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेला साजेसा निकाल दिला.
विभागनिहाय निकाल
- एम.एस्सी. केमिस्ट्री (द्वितीय सत्र) – ७८.९५ टक्के
- एम.एस्सी. केमिस्ट्री (चतुर्थ सत्र) – ९५.४५ टक्के
- एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजी (द्वितीय सत्र) – १०० टक्के
- एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजी (चतुर्थ सत्र) – १०० टक्के
- एम.एस्सी. प्राणिशास्त्र (चतुर्थ सत्र) – १०० टक्के
- एम.एस्सी. वनस्पतिशास्त्र (चतुर्थ सत्र) – १०० टक्के
- एम.एस्सी. पर्यावरण विज्ञान (चतुर्थ सत्र) – १०० टक्के
अध्यक्षीय भाषणात प्रा. एस. वाय. प्रभू यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, स्वायत्ततेतील पहिल्याच पदव्युत्तर बॅचने संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणि लौकिकाला नवी उंची मिळवून दिल्याचे गौरवोद्गार काढले.

प्राचार्य प्रा. अभय सामंत यांनी महाविद्यालयात ऑर्गेनिक केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, पर्यावरण विज्ञान, वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र या विषयांमध्ये एम.एस्सी. अभ्यासक्रम उपलब्ध असल्याची माहिती दिली. तसेच ऑर्गेनिक केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी आणि पर्यावरण विज्ञान या विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणारी जीएसएस महाविद्यालय ही या परिसरातील एकमेव संस्था असल्याचे त्यांनी सांगितले. या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, संशोधन आणि करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रमुख पाहुणे मधुकर सामंत यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे फलित असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.





