belgaum

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत शेतकरी प्रश्नांसह कॅन्टोन्मेंट हस्तांतरणाचा आढावा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील पीक नुकसान, कॅन्टोन्मेंटच्या नागरी भागाचे हस्तांतरण आणि कोटबागी उपसा सिंचन योजनेतील पाणीपुरवठ्याबाबत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी महत्त्वाची माहिती दिली. यरगट्टीसह तीन तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या शिफारशीपासून सिंचनासाठीच्या उपाययोजनांपर्यंत प्रशासनाच्या निर्णयांचा त्यांनी आढावा दिला.

पावसाच्या तुटवड्यामुळे यरगट्टी, सावदत्ती आणि रामदुर्ग तालुक्यांतील मूग आणि उडीद पिकांचे सुमारे २९ हजार हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले आहे. त्यामुळे या तीन तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्याची शिफारस राज्य सरकारकडे दोन दिवसांत करण्यात येणार आहे. बाधित शेतकऱ्यांना प्रतिएकर २ हजार ५०० रुपयांची विमा भरपाई मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. अथाणी आणि कागवाड तालुक्यांतील पावसाच्या तुटीबाबतही स्वतंत्र अहवाल सरकारला सादर केला जाणार आहे.

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील ७५६ एकर नागरी भाग महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. याबाबत घरे, व्यावसायिक गाळे, बंगले, मोकळ्या जागा, बाजारपेठा आणि रस्त्यांची माहिती असलेला सुमारे ७०० पानी सर्वंकष अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. नगरविकास विभागाकडून पडताळणीनंतर प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल आणि मंजुरीनंतर केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

 belgaum

कॅन्टोन्मेंट बोर्डावर सुमारे ३५० कोटी रुपयांचा कर्जबोजा असल्याने नागरी भागाचे व्यवस्थापन स्थानिक स्वराज्य संस्थेकडे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीनंतर हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होईल, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.

कोटबागी उपसा सिंचन योजनेच्या शेवटच्या टोकावरील शेतांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी आणखी दोन मोटारी बसवण्यात येणार आहेत. सध्या दोन मोटारी कार्यरत असून दुरुस्तीसाठी पाठवलेल्या मोटारी २ किंवा ३ सप्टेंबरपर्यंत परत मागवण्यात येतील. त्यानंतर ४ आणि ५ सप्टेंबरदरम्यान नवीन मोटारींची उभारणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आवश्यक उपाययोजना करत असून, त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याची गरज नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.