बेळगाव लाईव्ह : ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर आणि तालुक्यात २४ तास मद्यविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
२६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता सुरू होणारा हा निर्बंध २७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीत मद्याची दुकाने, वाईन शॉप, बार, क्लब, हॉटेलमधील बार आणि केएसबीसीएल डेपो बंद राहणार आहेत.
सर्व अबकारी परवानाधारक दुकाने बंद करून सील करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी अबकारी विभाग आणि पोलिस अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिला आहे.





