belgaum

गुंजीजवळ सर्विस रस्त्यावर ट्रक-टिप्पर अडकले; वाहतूक विस्कळीत

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: खानापूर-लोंढा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ (एनएच-४) वरील गुंजीजवळ सुरू असलेले मुख्य रस्ता आणि सर्विस रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुधवारी या परिसरातील सर्विस रस्त्यावर एका बाजूला टिप्पर पलटी होण्याच्या स्थितीत अडकून पडला, तर दुसऱ्या बाजूला चिखलात मोठा ट्रक रुतल्याने वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे वाहनधारक, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गुंजी परिसरातील सर्विस रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले असून संबंधित कंत्राटदाराकडून वारंवार वेळकाढूपणा होत आहे. पावसामुळे संपूर्ण सर्विस रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, अवजड वाहने अडकण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे वाहतुकीसह नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराला जाब विचारून काम तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, तसेच विलंबाबाबत आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. मात्र, या गंभीर प्रश्नाकडे खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी आणि आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तसेच भाजपाचे युवा नेते पंकज कुट्रे यांनी केला आहे.

 belgaum

“अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामामुळे नागरिकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्यात सर्विस रस्ता चिखलमय होत असल्याने वाहने अडकतात. शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसत आहे. लोकप्रतिनिधींनी संबंधित कंत्राटदाराची कानउघाडणी करून काम तातडीने पूर्ण करण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी,” अशी मागणी पंकज कुट्रे यांनी केली.

दरम्यान, रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे किंवा संथगतीने होत असल्यास संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासावी, कामाच्या गुणवत्तेची आणि विलंबाच्या कारणांची चौकशी करावी, तसेच दोषी आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

गुंजी परिसरातून दररोज मोठ्या संख्येने शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी ये-जा करतात. सर्विस रस्त्यावर चिखल, अवजड वाहने अडकणे आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तात्पुरत्या उपाययोजनांवर न थांबता सर्विस रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा, अशी मागणी पंकज कुट्रे आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.