belgaum

अल्पवयीन मुलाला दुचाकी चालवू दिली; वडिलांना ₹25,500 दंड

0
Conviction
 belgaum

बेळगाव लाईव्ह : अल्पवयीन मुलाला दुचाकी चालविण्यास परवानगी दिल्याप्रकरणी निपाणी येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (JMFC) न्यायालयाने संबंधित मुलाच्या वडिलांना ₹25,500 दंड ठोठावत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सार्वजनिक सुरक्षितता आणि रस्ते अपघात रोखण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

जिल्हा पोलीस प्रशासनाने वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बसविलेल्या ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन (ANPR) कॅमेऱ्याच्या मदतीने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर निपाणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसी क्रमांक 2352/2026 या प्रकरणात संभाजी हरिबा पवार (रा. यरनाळ, ता. निपाणी) यांनी आपल्या अल्पवयीन मुलाला दुचाकी चालविण्यास दिल्याचे सिद्ध झाले. मुलगा अल्पवयीन असल्याची पूर्ण जाणीव असूनही त्याला वाहन चालविण्यास परवानगी दिल्याने हा कायद्याचा गंभीर भंग असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

 belgaum

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपी वडिलांना ₹25,500 दंड ठोठावला. वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि पालकांची जबाबदारी याबाबत कठोर संदेश देणारा हा निर्णय असल्याचे मानले जात आहे.

न्यायालयाने केवळ वाहतूक नियमभंगाचा साधा गुन्हा म्हणून या प्रकरणाकडे न पाहता, सार्वजनिक जीविताची सुरक्षा आणि कायद्याचा सन्मान अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने कठोर भूमिका घेतली. या निर्णयामुळे “कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही” हा स्पष्ट संदेश समाजात गेला असून, नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.

पोलीस प्रशासनाने पालकांना आवाहन केले आहे की, अल्पवयीन मुलांना कोणत्याही परिस्थितीत वाहन चालविण्यास देऊ नये. अन्यथा मोटार वाहन कायद्यानुसार संबंधित पालकांवर कठोर कारवाई केली जाईल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.