बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेने “बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे” असा ठराव तातडीने मंजूर करावा. तसे न झाल्यास महापालिका बरखास्त करण्याची शिफारस नगरविकास मंत्री यतीन्द्र यांच्याकडे करणार असल्याचा इशारा कन्नड संघटनांचे नेते वाटाळ नागराज यांनी बुधवारी बेळगावात दिला.
बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महापालिकेत कर्नाटकच्या बाजूने ठराव मंजूर करण्यात होत असलेल्या दिरंगाईवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
वाटाळ नागराज म्हणाले, “गेल्या चार महिन्यांपासून कन्नड संघटना सातत्याने आंदोलन करत आहेत. मात्र, बेळगाव महापालिकेकडून अद्यापही ‘बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे’ असा ठराव मंजूर करण्यात आलेला नाही. महापालिकेने आपली भूमिका स्पष्ट करावी. ठराव मंजूर करण्यात आणखी विलंब झाल्यास महापालिका बरखास्त करण्याची मागणी नगरविकास मंत्री यतीन्द्र यांच्याकडे करणार आहे.”
यावेळी त्यांनी एमईएसवर बंदी घालण्याची मागणी पुन्हा एकदा केली. सीमाभागातील विकासाला गती देणे, कन्नड भाषिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि कन्नड माध्यमाच्या शाळांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

१३ ऑगस्ट रोजी कर्नाटक बंदची हाक;
उत्तर कर्नाटकाच्या विकासावर श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांना मागणी
: कावेरी नदीच्या पाणीवाटपाला विरोध, महादायी योजनेची तातडीने अंमलबजावणी आणि राज्याच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी १३ ऑगस्ट रोजी कर्नाटक बंदची हाक देण्यात आल्याची घोषणा ज्येष्ठ कन्नड चळवळीचे नेते वाटाळ नागराज यांनी केली.
बुधवारी बेळगाव येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महादायी, कळसा-बंडुरी, कावेरी आणि कृष्णा नदी पाणीवाटपाच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने कर्नाटकाची बाजू प्रभावीपणे मांडली नसल्याचा आरोप केला.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, शोभा करंदलाजे, व्ही. सोमण्णा आणि एच. डी. कुमारस्वामी यांनी राज्याच्या हिताचे रक्षण करण्यात अपयश आल्याची टीका त्यांनी केली. केंद्र सरकारसमोर राज्याच्या पाणीप्रश्नांवर ठोस भूमिका घेण्यात हे नेते कमी पडल्याचा आरोप त्यांनी केला.
उत्तर कर्नाटकाच्या विकासाबाबत राज्य सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी करत त्यांनी शेतकरी, सिंचन, जलसंपदा, वीज आणि औद्योगिक विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांकडे पुरेसे लक्ष दिले गेले नसल्याचे सांगितले. आगामी विधानमंडळ अधिवेशनात उत्तर कर्नाटकासाठी नेमके काय करण्यात आले, याचा खुलासा सरकारने करावा, असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिले.
कावेरी पाणीवाटपाच्या मुद्द्यावरही त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. तामिळनाडूमध्ये कावेरीच्या पाण्यासाठी तीव्र आंदोलन सुरू असताना कर्नाटक सरकारने अधिक ठाम भूमिका घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यातील पाणीप्रश्न, सिंचन योजना आणि उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी जनतेने १३ ऑगस्टच्या कर्नाटक बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही वाटाळ नागराज यांनी केले.





