बेळगाव लाईव्ह : बळ्ळारी नाल्याच्या प्रदूषणासह नाल्याची वर्षानुवर्षे रखडलेली सफाई, अतिक्रमण, बंद झालेले वहिवाटीचे रस्ते, बफर झोन निश्चित करणे आणि शेतजमिनींना बसणारा पुराचा फटका या विविध प्रश्नांवर शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. वडगाव येथील ज्ञानेश्वर मंदिरात झालेल्या बैठकीत या प्रश्नांवर निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला. प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास बळ्ळारी नाल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठा मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
बळ्ळारी नाल्याच्या परिसरातील समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ, जलवनस्पती, कचरा आणि घाण साचल्याने पाण्याचा प्रवाह मंदावला आहे. परिणामी, पावसाळ्यात नाल्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होऊन आजूबाजूच्या शेतांमध्ये पाणी साचते. नाल्याच्या दोन्ही बाजूंच्या सुमारे एक ते दोन किलोमीटर परिसरातील शेतीला दरवर्षी पुराचा फटका बसत असून, विशेषतः भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
अनगोळ शिवार, येळ्ळूर रोड, यरमाळ रोड, धामणे रोड, जुने बेळगाव आणि धारवाड रोड परिसरातून बळ्ळारी नाला वाहतो. खादरवाडी, अनगोळ शिवार, येळ्ळूर, यरमाळ, धामणे तसेच आसपासच्या भागातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी नाल्यात येते. मात्र, नाल्यातील गाळ, कचरा आणि इतर अडथळ्यांमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह विस्कळीत होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
२०२५ मध्येही दिले होते निवेदन
नाल्याची सफाई आणि आवश्यक बांधकामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी यापूर्वीही प्रशासनाकडे केली आहे. ९ जुलै २०२५ रोजी बळ्ळारी नाल्यालगतच्या शेतकऱ्यांनी लघु पाटबंधारे व भूजल विकास विभागाकडे निवेदन देऊन नाल्याची सफाई, गाळ काढणे आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्याची मागणी केली होती.
अधिकारी पूरस्थितीची पाहणी करून नोंद करतात; मात्र त्यानंतर कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
नाल्यात मिसळणारे दूषित पाणी बंद करण्याची मागणी
बैठकीत येळ्ळूर येथील केएएलई परिसरातून बळ्ळारी नाल्यात मिसळणाऱ्या दूषित पाण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. हे पाणी तातडीने बंद करावे, अशी मागणी करण्यात आली. यासाठी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन संबंधित परिसराची पाहणी करावी आणि दूषित पाण्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, असे ठरविण्यात आले.
हॉस्पिटलमधून सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे नाल्याचे प्रदूषण वाढत असल्याचा आरोपही बैठकीत करण्यात आला. नाल्यातील पाण्याचे नमुने तपासून प्रदूषणाचे मूळ कारण शोधावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जयराज हलगेकर यांनी केली.
अतिक्रमणांमुळे नैसर्गिक जलमार्ग बंद
बळ्ळारी नाल्याच्या परिसरातील अनेक लहान जलवाहिन्या आणि नैसर्गिक पाण्याचे मार्ग अतिक्रमणामुळे बंद झाल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन शेतजमिनींमध्ये पाणी साचत असल्याचे त्यांनी सांगितले.
नाल्याची मूळ हद्द निश्चित करून सर्वेक्षण करावे, नाल्यालगतचा बफर झोन निश्चित करावा आणि नाल्याच्या हद्दीतील अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी शेतकरी नेते राजू मर्वे यांनी केली.

बंद झालेले वहिवाटीचे रस्ते सुरू करण्याची मागणी
बळ्ळारी नाला आणि हलगा-मच्छे बायपास परिसरातील अनेक पारंपरिक वहिवाटीचे रस्ते बंद करण्यात आल्याचा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला. या रस्त्यांचा वापर शेतकरी आपल्या शेतजमिनीपर्यंत जाण्यासाठी करत होते. रस्ते बंद झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने हे रस्ते पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नितीन खनूकर यांनी केली.
बैठकीतील प्रमुख निर्णय व मागण्या
बैठकीत बळ्ळारी नाल्याच्या समस्यांबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये पुढील मागण्यांचा समावेश आहे.
- बळ्ळारी नाल्याची स्वच्छता : बळ्ळारी नाला लवकरात लवकर पूर्णपणे स्वच्छ करण्यात यावा. नाल्यातील गाळ, कचरा आणि जलवनस्पती हटवून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत करावा, जेणेकरून दुर्गंधी पसरू नये आणि सांडपाणी शेतवावरात साचणार नाही.
- पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई : पावसाचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामा करण्यात यावा आणि पात्र शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई देण्यात यावी.
- प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बैठक : या दोन्ही महत्त्वाच्या मुद्द्यांसह बळ्ळारी नाल्याच्या इतर प्रलंबित प्रश्नांकडे सरकार आणि जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी तातडीने बैठक घेण्यात येणार आहे.
- दूषित पाण्याचा प्रश्न सोडविणे : नाल्यात मिसळणारे दूषित पाणी तातडीने बंद करून पाण्याचे नमुने तपासण्यात यावेत आणि प्रदूषणाचे मूळ कारण शोधून दोषींवर कारवाई करण्यात यावी.
- अतिक्रमणे हटविणे : बळ्ळारी नाल्याची मूळ हद्द निश्चित करून सर्वेक्षण करावे, बफर झोन निश्चित करावा आणि नाल्याच्या हद्दीतील अतिक्रमणे हटवावीत.
- वहिवाटीचे रस्ते सुरू करणे : शेतकऱ्यांच्या शेतजमिनीपर्यंत जाणारे पारंपरिक वहिवाटीचे रस्ते पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी.
“आता बस झाले; रस्त्यावरची लढाई करावी लागेल”
शेतकरी नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही प्रश्न सुटत नसल्याने आता रस्त्यावर उतरून लढा देण्याची वेळ आली असल्याचे सांगितले.
“आता बस झाले. बळ्ळारी नाल्याच्या प्रश्नासाठी रस्त्यावरची लढाई करणे गरजेचे आहे.” असे सांगत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला.
येत्या दोन दिवसांत संबंधित सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यावी आणि मागण्यांचे निवेदन सादर करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांनी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याची सूचना केली. प्रशासनासमोर सर्व समस्या मांडल्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवावी, असे त्यांनी सांगितले. उमेश पाटील यांनी जेएनजीच्या धर्तीवर आंदोलन उभारण्याचा सल्ला दिला.
मोर्चाचा इशारा
प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास बळ्ळारी नाल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठा मोर्चा काढण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन समस्यांवर ठोस निर्णय मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शिवाजी तारिहाळकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदारांनी या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. या समस्येची गंभीरता माजी मंत्री प्रभाकर कोरे यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी त्यांची भेट घ्यावी, अशी मागणी शंकर बाबली महाराज यांनी केली.
अमोल देसाई यांनी प्रास्ताविकातून बळ्ळारी नाल्याचा इतिहास आणि सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. नाल्याच्या दुरवस्थेमागे अनेक कारणे असून, दूषित पाण्याचा त्यात मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका आयुक्तांशी चर्चा करून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली.
बैठकीस रमाकांत कोंडुस्कर, शंकर बाबली महाराज, अमोल देसाई, मनोहर हलगेकर, राजू मर्वे, नितीन खनूकर, देवकुमार बिरजे, जयराज हलगेकर, माधुरी जाधव यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
युवा कार्यकर्ते संतोष शिवनगेकर यांनी आभार मानताना बळ्ळारी नाल्याचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर आला असून, शेतकऱ्यांनी एकजुटीने आरपारची लढाई हाती घ्यावी, असे आवाहन केले.
बळ्ळारी नाल्याची तातडीने सफाई, गाळ व कचरा हटविणे, नैसर्गिक जलप्रवाह सुरळीत करणे, अतिक्रमणे हटविणे, दूषित पाण्याचा प्रश्न सोडविणे, पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई देणे आणि प्रलंबित बांधकामे पूर्ण करणे या मागण्यांवर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





