बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या जैन हेरिटेज स्कूलमधील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनानिमित्त सैनिकांसाठी तीन हजार पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या आहेत. या राख्या टपालाद्वारे देशातील विविध लष्करी केंद्रांवर पाठवण्यात आल्या आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून शाळेतील विद्यार्थी देशाच्या विविध भागांत तैनात असलेल्या सैनिकांना टपालाद्वारे राख्या पाठवत आहेत. यंदा कारवार येथील कदंब नौदल तळ, उत्तर प्रदेशातील डोग्रा रेजिमेंटल सेंटर आणि तमिळनाडूतील मद्रास रेजिमेंटल सेंटरसह अन्य ठिकाणी राख्या पाठवण्यात येणार आहेत.
शाळेत पहिली ते दहावीपर्यंत एक हजार ३०० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी स्काउट्स अँड गाइड्स विभागातील तसेच या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा असलेले विद्यार्थी राख्या तयार करतात. रक्षाबंधनाच्या सुमारे महिनाभर आधी विद्यार्थ्यांना राखी तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी विद्यार्थी उत्साहाने या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होत असल्याचे शाळेच्या प्राचार्या रोहिणी के. बी. यांनी सांगितले.

तांदूळ, डाळी, धान्य, वनस्पतींच्या बिया, काजू, बेदाणे, शेंगदाणे आणि अन्य पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून राख्या तयार केल्या जातात. स्थानिक पातळीवर तैनात असलेल्या सैनिकांना विद्यार्थी स्वतः राखी बांधतात, अशी माहिती स्काउट्स अँड गाइड्स विभागाच्या संचालिका पल्लवी नाडकर्णी यांनी दिली.
काही विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी पत्रेही लिहिली आहेत. देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांमुळे आपण सुरक्षित जीवन जगत आहोत. कुटुंबापासून दूर राहून देशसेवा करणाऱ्या सैनिकांसाठी राख्या तयार करून पाठवता येत असल्याचा अभिमान वाटतो, अशी भावना विद्यार्थिनी अदिती बरकी आणि वर्षिणी पसाने यांनी व्यक्त केली.





