बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या जलतरण क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. आबा स्पोर्ट्स क्लबचे माजी जलतरणपटू, राष्ट्रीय जलतरण सुवर्णपदक विजेते आणि अनेक विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर घडवणारे प्रशिक्षक शिवराज अनंत मोहिते (वय ३७) यांचे सोमवारी (३ ऑगस्ट) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
सोमवारी सकाळी सुमारे सातच्या सुमारास त्यांना छातीत दुखू लागल्याने तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. तेथे ईसीजी करण्यात आला आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, काही वेळाने बाथरूममधून बाहेर आल्यानंतर त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने वेणूग्राम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शिवराज मोहिते यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, बहीण तसेच कुटुंबीय असा मोठा परिवार आहे. त्यांचे वडील कै. अनंत रामचंद्र मोहिते हे महानगरपालिका जलतरण प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध होते. वडिलांचा वारसा पुढे नेत शिवराज यांनीही जलतरण क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक विजेते म्हणून त्यांनी बेळगावचे नाव देशभर गाजवले. त्यानंतर प्रशिक्षक म्हणून त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना जलतरणाचे धडे दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळवली.

लहान मुलांमध्ये ते ‘शिवा सर’ या नावाने विशेष लोकप्रिय होते. शिस्त, प्रेमळ स्वभाव, संयमी प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांप्रती असलेले समर्पण यामुळे ते प्रत्येकाच्या मनात घर करून राहिले होते.
त्यांच्या अकाली निधनाने केवळ एक उत्कृष्ट जलतरणपटूच नव्हे, तर प्रेरणादायी प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि अनेक विद्यार्थ्यांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात त्यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.





