बेळगाव लाईव्ह : कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय हा पक्षासाठी सकारात्मक प्रयोग असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माध्यमांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय आधीच निश्चित झाला होता आणि त्यानुसार यादी जाहीर करण्यात आली. २० जणांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले असून, हायकमांडच्या सूचनेनुसार नवख्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना अधिक महत्त्व देण्यात आले असून, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच अल्पसंख्याक समाजालाही योग्य प्रतिनिधित्व मिळाले आहे. नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे भविष्यात ते काँग्रेस पक्षाची ताकद बनतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्रीपदाबाबत विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्याची चर्चा सुरू असल्याच्या प्रश्नावर जारकीहोळी म्हणाले, “चर्चा झाली होती, मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यासाठी अजूनही संधी आहे. कोणत्याही वेळी निर्णय होऊ शकतो. थोडी प्रतीक्षा करूया.”
स्वतःने उपमुख्यमंत्रीपदासाठी मागणी केली का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “मी कोणतीही मागणी केलेली नाही. पक्षपातळीवर विविध समाजांना प्रतिनिधित्व देण्याबाबत चर्चा सुरू होती. अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून, भविष्यात कधीही यावर निर्णय होऊ शकतो.”





