belgaum

त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशीही ED ची झाडाझडती

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी सुरू असलेली अंमलबजावणी संचालनालयाची (ED) चौकशी आणि झडती दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. बुधवारी सकाळपासून सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती आणि गुरुवारी सकाळीही EDचे अधिकारी सतीश जारकीहोळी यांच्या बेंगळुरूतील डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानी उपस्थित असल्याचे वृत्त आहे.

EDने कर्नाटकातील बेंगळुरू, बेळगाव आणि गोकाकसह अनेक ठिकाणी एकाचवेळी झडती घेतली. सतीश जारकीहोळी यांच्या कुटुंबीयांशी तसेच काही निकटवर्तीयांशी संबंधित ठिकाणांचाही यात समावेश असल्याचे वृत्त आहे.

परदेशातील गुंतवणुकीचा तपास

या कारवाईचा संबंध फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट अर्थात FEMA अंतर्गत सुरू असलेल्या तपासाशी असल्याचे EDकडून सांगण्यात आल्याचे वृत्त आहे. दक्षिण आफ्रिका, युगांडा यांसह परदेशात कथितरीत्या झालेल्या गुंतवणुकी आणि आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे तपासली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

 belgaum

दरम्यान, सतीश जारकीहोळी यांच्या नातेवाईकांशी संबंधित यापूर्वीच्या अबकारी प्रकरणातील कारवाई आणि सध्याच्या तपासाचा संबंध नसल्याचे EDने स्पष्ट केल्याचेही वृत्त आहे. सध्याची कारवाई परदेशातील गुंतवणूक आणि कथित आर्थिक व्यवहारांशी संबंधित स्वतंत्र प्रकरणात होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

सुमारे 18 ठिकाणी कारवाई

बुधवारी सुमारे 18 ठिकाणी EDची झडती झाल्याचे विविध वृत्तांत नमूद करण्यात आले आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानांसोबतच त्यांच्या कुटुंबीय आणि निकटवर्तीयांशी संबंधित ठिकाणांवरही कागदपत्रे व आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आली.

रात्री उशिरापर्यंत सतीश जारकीहोळी यांची चौकशी सुरू होती. त्यानंतरही काही अधिकारी त्यांच्या निवासस्थानी थांबले असून शोधमोहीम पूर्ण होईपर्यंत कारवाई सुरू राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

EDच्या झडतीत नेमके काय आढळले आणि कोणती कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे आरोपांबाबत अंतिम निष्कर्ष काढणे तूर्तास टाळणे आवश्यक आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.