belgaum

पारंपरिक वाद्ये अन् मर्दानी खेळांनी गाजला हा आगमन सोहळा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: आकर्षक फटाक्यांची आतषबाजी… डोळ्यांचे पारणे फेडणारी मनमोहक रोषणाई… पारंपरिक वाद्यांचा दणदणाट… लेझीमचा ताल… मर्दानी खेळांचा थरार आणि हजारो गणेशभक्तांची अलोट गर्दी… अशा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात बेळगावच्या खडक गल्लीतील सार्वजनिक गणपती, मानाच्या राजाचा आगमन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

यंदाच्या आगमन सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे डीजे आणि डॉल्बीला फाटा देत पारंपरिक कला आणि वाद्यांना देण्यात आलेले प्राधान्य. त्यामुळे मिरवणुकीला पारंपरिकतेचा अनोखा साज चढला.

कोल्हापूरच्या बेंजो आणि ढोल पथकाच्या गजरात धर्मवीर संभाजी महाराज चौक अक्षरशः गर्दीने फुलून गेला. ढोल-ताशांचा निनाद, बेंजोचे सूर आणि हलगीच्या दणदणाटामुळे संपूर्ण परिसर गणेशमय झाला.

 belgaum

महाराष्ट्रातून आलेल्या कोल्हापूर भुदरगड-केळेवाडीच्या लेझीम पथकाने आपल्या तालबद्ध सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. लेझीमच्या प्रत्येक ठेक्यावर तरुणांसोबतच उत्साही वयोवृद्धांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. वयोवृद्धांचा उत्साह आणि ठेक्यावरचा त्यांचा नृत्याविष्कार विशेष लक्षवेधी ठरला.

तर साताऱ्याच्या मर्दानी साहसी खेळांच्या पथकाने शिवकालीन परंपरेची आठवण करून देणारी थरारक प्रात्यक्षिके सादर केली. विविध मर्दानी खेळांसोबत मशालींच्या आकर्षक कसरतींनी उपस्थितांची दाद मिळवली. साहसी खेळ सुरू असताना गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहात टाळ्यांचा कडकडाट केला.

हलगी पथकाचा उत्साहही पाहण्यासारखा होता. पारंपरिक वाद्यांचा निनाद, लेझीमचा ताल आणि मर्दानी खेळ यामुळे संपूर्ण मिरवणुकीत एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती.

आकर्षक फटाक्यांची आतषबाजी आणि रंगीबेरंगी रोषणाईने आगमन सोहळ्याचे दृश्य अधिकच मनमोहक झाले. मिरवणुकीच्या मार्गावर हजारो गणेशभक्तांनी गर्दी केली होती. गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

या सोहळ्याला माजी आमदार अनिल बेनके, श्रीराम सेना हिंदुस्तानचे रमाकांत कोंडुस्कर, भरत पाटील, भाजप नेते मुरगेंद्र गौडा पाटील, युवा उद्योजक कपिल भोसले आणि युवा नेते सुनील जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.

अनिल बेनके : पारंपरिक गणेशोत्सवाची परंपरा जपा

यावेळी बोलताना माजी आमदार अनिल बेनके यांनी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.

“डीजे आणि डॉल्बीला फाटा देऊन पारंपरिक वाद्ये, लेझीम आणि मर्दानी खेळांना प्रोत्साहन देणे ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. शिवाजी महाराजांच्या काळातील मर्दानी खेळ पुन्हा गणेशोत्सवात पाहायला मिळत आहेत,” असे बेनके म्हणाले.

“कोल्हापूरच्या लेझीम पथकाने आणि साताऱ्याच्या मर्दानी खेळांच्या पथकाने आगमन सोहळ्याची शोभा वाढवली आहे. अशाच पद्धतीने सर्व गणेश मंडळांनी आपल्या पारंपरिक कला आणि संस्कृतीचे जतन केले पाहिजे,” असेही त्यांनी सांगितले.

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचा आणि राष्ट्रीय भावना जागृत करण्याचा विचार मांडला होता. तोच उद्देश पुढे नेण्याची गरज असल्याचे बेनके यांनी नमूद केले.

येत्या दिवसांत गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक बेळगावात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून शांतता, शिस्त आणि उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही बेनके यांनी केले.

एकूणच, फटाक्यांची आतषबाजी, आकर्षक रोषणाई, हजारो भाविकांची गर्दी, कोल्हापूरचा बेंजो-ढोल, लेझीमचा ताल, हलगीचा दणदणाट आणि साताऱ्याच्या मर्दानी खेळांचा थरार यामुळे खडक गल्लीच्या मानाच्या राजाचा आगमन सोहळा यंदा बेळगावच्या गणेशोत्सवातील विशेष आकर्षण ठरला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.