बेळगाव लाईव्ह: कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यावरील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कारवाईविरोधात त्यांच्या समर्थकांनी बुधवारी कित्तूर राणी चन्नम्मा चौकात निदर्शने केली.
यावेळी सतीश जारकीहोळी समर्थक अहमद रेशमी यांनी केंद्र सरकार आणि EDच्या कारवाईवर तीव्र शब्दांत टीका केली. जारकीहोळी यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही राजकीय द्वेषातून आणि सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
सतीश जारकीहोळी हे दलित, गरीब आणि सामान्य कुटुंबातील नागरिकांसाठी काम करणारे नेते असून, शिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून अनेकांना मदत करत असल्याचे रेशमी यांनी सांगितले. अशा नेत्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘EDची कारवाई काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच का होते? भाजपच्या नेत्यांवर EDची कारवाई का होत नाही?’ असा सवालही अहमद रेशमी यांनी उपस्थित केला.

सतीश जारकीहोळी हे भविष्यात सक्षम दलित मुख्यमंत्री म्हणून पुढे येऊ शकतात, त्यामुळे त्यांची राजकीय प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने ही कारवाई केली जात असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, केंद्र सरकारने हा कथित राजकीय छळ तातडीने थांबवला नाही, तर संपूर्ण कर्नाटकात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सतीश जारकीहोळी समर्थकांकडून देण्यात आला.
जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर झालेल्या या निदर्शनांमुळे सतीश जारकीहोळी समर्थकांनी ED कारवाईविरोधात जोरदार आवाज उठवला.





