belgaum

नवरत्न सन्मानाने श्री गणेश फेस्टिवलची यशस्वी सांगता

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : गेल्या २७ वर्षांपासून बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला विधायक आणि सामाजिक दिशा देणाऱ्या श्री गणेश फेस्टिवलचा यंदाचा सोहळा नवरत्न सन्मानाने उत्साहात संपन्न झाला. बुधवारी सायंकाळी गुड शेड रोड येथील श्री माता सभागृहात नवरत्न सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

६ सप्टेंबरपासून यंदाच्या श्री गणेश फेस्टिवलला सुरुवात झाली होती. तीन दिवसांच्या या उत्सवात महिलांसाठी विविध स्पर्धा तसेच नक्षत्र ग्रुपतर्फे मंगळागौर लोकसंस्कृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांना गणेश भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

उत्सवाच्या अंतिम दिवशी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘नवरत्न सन्मान’ देऊन गौरव करण्यात आला.

 belgaum

यामध्ये समाजसेवेसाठी अवधूत तुडवेकर, साहित्य क्षेत्रासाठी शोभा नायक, सामाजिक संस्थेसाठी समर्पण युथ फाऊंडेशन, श्रमसेवेसाठी आशा पत्रावळी, संगीत क्षेत्रासाठी अशोक परांजपे, क्रीडा क्षेत्रासाठी ललिता गवस, कला क्षेत्रासाठी अजित औरवाडकर, उद्योग क्षेत्रासाठी आयडियल प्रॉडक्टचे समीर लोकूर आणि कृषी क्षेत्रासाठी राजू मर्वे यांचा समावेश होता.

गणेश फेस्टिवल समितीचे अध्यक्ष मनोहर देसाई, मनोरमा देसाई, रूपाली जनाज, डॉ. मीना पाटील, प्रतिभा नेगिनहाळ, अनुराधा देसाई, श्वेता देसाई, श्रीकांत काकतीकर, मारुती देसाई आदी मान्यवरांच्या हस्ते नवरत्नांचा शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ, प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींनी यावेळी मिळालेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

‘गणेश फेस्टिवल हा संस्कृती आणि समाजप्रबोधनाचा उत्सव’

प्रास्ताविकात मनोहर देसाई यांनी सांगितले की, गणेश फेस्टिवल हा केवळ उत्सव नसून संस्कृती जपण्याचा आणि समाजप्रबोधनाचा उपक्रम आहे. समाज एकसंघ राहावा यासाठी या व्यासपीठाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. तळागाळात काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचे कौतुक व्हावे आणि उपेक्षितांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

‘नवरत्न सन्मान हा व्यक्तींच्या कार्यासोबतच समाजातील सद्गुणांचा सन्मान आहे,’ असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीकांत काकतीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विलास अध्यापक यांनी आभार मानले, तर वसुधा सांबरेकर यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाला श्री माता सोसायटी, श्री राजमाता सोसायटी आणि श्री भक्ती सोसायटीचे संचालक व पदाधिकारी, ज्ञानमंदिर इंग्रजी शाळेतील शिक्षिका व कार्यकारी वर्ग तसेच गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.