belgaum

मालकाच्या मृत्यूनंतरही स्वतःला मालक सांगत जमीन विकण्याचा प्रयत्न

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : मालमत्तेच्या मूळ मालकाचा मृत्यू झाल्यानंतरही आपणच मालक असल्याचे भासवून जमीन विक्रीचा करार केल्याच्या आरोपावरून मार्केट पोलिसांनी 75 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. रामचंद्र व्यंकटेश देशपांडे (वय 75, रा. पाटील गल्ली, कोटबागी, ता. हुक्केरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी श्रीशैल दत्तात्रेय गुरव (वय 29, रा. तोपिनकट्टी, ता. खानापूर) यांनी 19 फेब्रुवारी 2025 रोजी मार्केट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मार्केट पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 34/2025 दाखल करण्यात आला होता.

पोलिसांच्या तपासानुसार, तक्रारदाराचे आजोबा मशणू जायप्पा गुरव आणि त्यांच्या भावांनी सन 1998 मध्ये चिदंबर श्रीपाद कुलकर्णी आणि रमेश दिगंबर कुलकर्णी यांच्याकडून बडाल अंकलगी गावच्या हद्दीतील सर्व्हे क्रमांक 340 मधील 7 एकर 32 गुंठे जमीन खरेदी केली होती. ही जमीन त्यांच्या ताब्यात आणि वहिवाटीत होती.

 belgaum

मात्र, जमिनीचे मूळ मालक चिदंबर श्रीपाद कुलकर्णी यांचे निधन झाल्यानंतरही आरोपी रामचंद्र देशपांडे याने आपणच सदर मालमत्तेचा मालक असल्याचे भासविल्याचा आरोप आहे. त्याने बेळगाव उपनिबंधक कार्यालयात जाऊन वेब कॅमेऱ्यासमोर फोटो काढून घेतला आणि अंगठ्याचा ठसा देत सदर मालमत्तेबाबत अन्य आरोपींच्या नावे ‘अ‍ॅग्रीमेंट ऑफ सेल’ केल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकारातून तक्रारदाराची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी रामचंद्र देशपांडे याला 11 ऑगस्ट 2026 रोजी अटक केली.

या प्रकरणात विनोद देशपांडे याच्यासह इतर आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास मार्केट पोलिसांकडून करण्यात येत आहे.

या कारवाईत मार्केट पोलिस ठाण्याचे पीआय जे. एम. कालिमिर्ची, पीएसआय एच. एल. केरूर आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कामगिरीचे बेळगाव शहर पोलिस आयुक्त आणि डीसीपी यांनी कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.