belgaum

वडगाव जत्रेत स्वच्छतेचा बोजवारा;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : वडगाव येथील जत्रेदरम्यान महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजल्याचे चित्र समोर आले आहे. जत्रेसाठी बाहेरून आलेले विक्रेते, खेळणी विक्रेते आणि इतर व्यावसायिकांसाठी आवश्यक तात्पुरती अथवा फिरती शौचालये उपलब्ध करून न दिल्याने अनेकांना रस्त्याच्या कडेला तसेच लगतच्या शेतांमध्ये उघड्यावर शौचास जाण्याची वेळ आली आहे.

येरमाळ रोड परिसरात मोठ्या प्रमाणात विक्रेते आणि नागरिकांची गर्दी होत असताना स्वच्छतागृहांची कोणतीही पुरेशी व्यवस्था नसल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यालगत आणि शेतांमध्ये अस्वच्छता निर्माण झाली असून, परिसरातील नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जत्रेसाठी आलेल्या सुमारे २०० ते ४०० लोकांना शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने उघड्यावर शौचास जाण्याची वेळ येत आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 belgaum

विशेषतः महिलांना या परिस्थितीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्याने ये-जा करताना तसेच शेताकडे जाताना उघड्यावर शौच करणाऱ्या लोकांमुळे महिलांना संकोचजनक परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

शेतकऱ्यांचीही मोठी गैरसोय होत आहे. गवत कापण्यासाठी किंवा अन्य शेतीकामांसाठी शेतात जाणाऱ्या नागरिकांना मानवी विष्ठेतून वाट काढावी लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

एकीकडे बेळगावला ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित करण्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे जत्रेसारख्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात साधी स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध होत नसल्याने महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्वच्छ भारत अभियान आणि हागणदारीमुक्त भारताच्या उद्दिष्टांनाही या परिस्थितीमुळे हरताळ फासला जात असल्याची टीका स्थानिकांकडून होत आहे.

जत्रा परिसरात तातडीने मोबाइल किंवा तात्पुरती शौचालये उभारावीत, नियमित स्वच्छता करावी आणि नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. महापालिका प्रशासन या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन कारवाई करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.