बेळगाव लाईव्ह : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर निवडणूक प्रक्रियेत फेरफार केल्याचा आणि मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळल्याचा आरोप करत त्यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी बेळगावात करण्यात आली आहे. प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जीवन विवेक प्रतिष्ठान आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन सादर केले.
गेल्या काही महिन्यांत ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (एसआयआर) प्रक्रियेच्या माध्यमातून देशभरातील १३ कोटींपेक्षा जास्त मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगातील निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या एकतर्फी निर्णयांवर आणि फॉर्म-६ मधील बदलांवर गेल्या १० महिन्यांत किमान १४ वेळा आक्षेप घेतल्याचे तपासातून समोर आले आहे.

निवडणूक आयोगाची स्वायत्तता धोक्यात आणून सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी त्याचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या वेळी प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे, सचिव कृष्णा शहापूरकर, सीपीआयचे राज्य सचिव कॉम्रेड अनिल आजगावकर यांच्यासह शंकर चौगुले, एस. आर. पाटील, नागेश साळुंखे, बसवंत शहापूरकर, सतीश देसाई, संजय पाटील, मधू पाटील आणि धुळाप्पा कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.





