belgaum

मण्णूर गायरान संरक्षणासाठी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील मण्णूर येथील देवस्की पंच कमिटी व ग्राम सुधारणा मंडळाच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शासकीय गायरान जमिनीच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

मण्णूर गावातील सुमारे ७५ टक्के नागरिक कृषी आणि पशुपालनावर अवलंबून आहेत. गावात आधीच जमिनीचा अभाव असताना सर्व्हे क्र. १०१ मधील उर्वरित १३ एकर २५ गुंठे जागेवरील एकमेव क्रीडा मैदान आश्रय योजनेसाठी वापरण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

तसेच सर्व्हे क्र. १४७ मधील ११ एकर १८ गुंठे गायरान जागेवर तूरमुरी येथील कचरा प्रकल्प हलवण्याचे चाललेले सर्वेक्षण तात्काळ थांबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तूरमुरी येथील कचरा डेपोमुळे आधीच दुर्गंधी, दूषित पाणी आणि माशांचा त्रास सहन करावा लागत असल्याने हा प्रकल्प मण्णूरमध्ये नको, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

 belgaum

याशिवाय सर्व्हे क्र. ५ मधील ९ एकर २५ गुंठे गायरान जागेवर दरवर्षी रेणुका यात्रा आणि दसरा सिमोल्लंघन सोहळा पार पडतो. या जागेवर कामगार विभाग, निवासी शाळा किंवा इंग्रजी माध्यम शाळा उभारण्यासाठी प्रशासनाकडून जमीन अधिग्रहणाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत,

या धार्मिक व सांस्कृतिक जागेचे अस्तित्व अबाधित ठेवावे, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. सर्व्हे क्र. ५, १०१ आणि १४७ मधील सर्व सर्वेक्षणे रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

याप्रसंगी विनय कदम, अरुण यल्लाप्पा सांबरेकर, मारुती नारायण चौगुले, यल्लाप्पा भैरू करटकर, संदीप परशुराम डोणकरी, रवी रामचंद्र चौगुले, उमेश आप्पाजी चौगुले, मारुती दुंडप्पा मंडोळकर, शिवाजी बाळप्पा कदम आणि यल्लाप्पा वैजू माळी यांच्यासह देवस्की पंच कमिटीचे अध्यक्ष व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.