बेळगाव लाईव्ह : विविध मागण्या मान्य करण्यासाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी सुवर्ण विधानसौधपासून हुबळीच्या दिशेने पदयात्रा सुरू केली आहे. केंद्रातील भाजप सरकार आणि राज्य सरकारविरोधात अन्नदात्यांनी जोरदार रोष व्यक्त केला आहे.
बेळगावमधील सुवर्ण विधानसौधपासून सुरू झालेली ही पदयात्रा आज सायंकाळी एम. के. हुबळी येथे पोहोचणार असून तिथेच शेतकऱ्यांचे वास्तव्य असणार आहे. आंदोलनादरम्यान केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी विविध मागण्यांसाठी लढा देत आहेत, मात्र सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या आंदोलनाबाबत बोलताना शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष चुन्नप्पा पुजारी म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पदयात्रेच्या माध्यमातून हुबळीकडे जात असून, सरकार ऊस, साखर आणि इतर पिकांच्या दराबाबत शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. साखर कारखान्यांचे दर वाढवले जात नाहीत आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात नाहीत, असे त्यांनी सांगितले.

तसेच, आंदोलनाचे समर्थन करताना जावेद मुल्ला यांनी सांगितले की, केंद्र सरकारने साखरेचा आणि शेतमालाचा दर वाढवावा यासाठी हा लढा सुरू आहे.
हुबळीपर्यंत जाणाऱ्या या पदयात्रेत शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा नेत्यांनी दिला आहे.





