बेळगाव लाईव्ह : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती, शिस्त आणि तंदुरुस्तीचा संदेश देत बेळगावमध्ये ‘तिरंगा ऑन व्हील्स’ या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. भारतीय लष्कराच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत तरुण विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सुमारे 20 किलोमीटरची ही सायकल रॅली यळ्ळूर किल्ल्यापर्यंत काढण्यात आली.
या रॅलीला बेळगाव स्टेशन कमांडर तसेच द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, SM, VSM** यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःही तरुण सायकलस्वारांसोबत सायकल चालवत रॅलीत सहभाग घेतला.
राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, आर्मी पब्लिक स्कूल, पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड स्कूल, बेळगाव येथील विद्यार्थी व शिक्षकांनी स्वेच्छेने या रॅलीत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता.

द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे अधिकारी, जेसीओ आणि जवानही विद्यार्थ्यांसोबत रॅलीत सहभागी झाले. त्यांनी संपूर्ण मार्गावर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. यळ्ळूर किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाची ओळख करून घेत स्वातंत्र्याच्या उत्सवात सहभागी होण्याची संधी विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाली.
‘तिरंगा ऑन व्हील्स’ ही केवळ सायकल रॅली न राहता भारतीय लष्कर, शैक्षणिक संस्था आणि नागरिक यांना जोडणारा देशभक्तीचा उपक्रम ठरला. भारताच्या स्वातंत्र्याला 80 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रॅलीमुळे स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला तरुणाईचा उत्साह आणि देशभक्तीची नवी ऊर्जा मिळाली.





